पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार, युवराज छत्रपती संभाजीराजे तसेच मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक आणि तारादूत प्रतिनिधी त्याचबरोबर सारथीच्या संचालक मंडळाबरोबर १९ जून २०२१ रोजी बैठक झाली होती. त्या बैठकीत अजित पवार यांनी तारादूत प्रकल्प सुरू करण्याचे आदेश सारथीच्या संचालक मंडळाला दिले होते. मात्र, तरीही याबाबत प्रस्ताव पाठवण्यापलीकडे काहीही हालचाल न झाल्याने अखेर राज्यातील तारादूतांनी सारथी कार्यालयासमोर बुधवार (दि. २०) रोजी सकाळी ११ वाजल्यापासून बेमुदत आंदोलन सुरू केले.
मात्र, येत्या १ नोव्हेंबरपासून ज्यांचे प्रशिक्षण झाले आहे, अशा ५०-१०० तारादूतांना काम सुरू करण्याची ऑर्डर देण्यात येईल, असे सारथीच्या संचालकांनी आश्वासन दिले आहे. त्यामुळे बेमुदत आंदोलन स्थगित करत असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर यांनी सांगितले.
चार महिने हाेत आले तरी तारादूत प्रकल्पाबाबत काहीच हालचाली होत नव्हत्या. सारथीच्या योजनेला वारंवार मुदतवाढ द्यावी लागत असल्याने राज्यातील तारादूतांनी बेमुदत आंदोलन सुरू केले होते. याबाबत सचिन आडेकर म्हणाले, की मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व शाश्वत विकासासाठी, सारथीच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी तारादूत प्रकल्प हा महत्त्वाचा आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १९ जून २०२१ रोजी झालेल्या बैठकीत तारादूत प्रकल्प तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, चार महिने पूर्ण होत आले तरी तारादूत प्रकल्प हा सुरू झालेला नाही. त्यामुळे नाईलाजाने बेमुदत आंदोलन सुरू केले होते.