पाटेठाण : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत टाकळी भीमा (ता. दौंड) येथे ग्रामस्थांना रेशनिंग कार्ड, विद्यार्थिनींना सायकली, शेतकरीवर्गाला रासायनिक खते, प्रमाणपत्र, दाखले अशा विविध वस्तूंचे वाटप माजी आमदार रंजना कुल, तहसीलदार उत्तम दिघे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात शेतकरी, मजूर यांच्या विविध तक्रारीचे निवारण झाल्याने ग्रामस्थांनी उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले आहे. टाकळी भीमा (ता. दौंड) येथे तहसीलदार उत्तम दिघे यांच्या नेतृत्वाखाली ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार रंजना कुल होत्या. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर यांना महसूल, कृषी, आरोग्य, पशुवैद्यकीय, शिक्षण, अशा विविध क्षेत्रांत निगडित प्रश्न सोडवण्यासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. म्हणूनच जनतेला शासकीय कार्यप्रणालीचा अनुभव घेता यावा, चावडी वाचनाद्वारे नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तत्काळ होण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम सुरू करण्याचा शासनाचा उद्देश असल्याचे तहसीलदार उत्तम दिघे यांनी सांगितले. या वेळी माजी आमदार रंजना कुल म्हणाल्या, की नागरिकांनी आपल्या कामासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. टाकळी भीमा येथे दौंड व शिरूर तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे परिसराचा विकास होण्यासाठी मदत होईल.या वेळी गटविकास अधिकारी संतोष हराळे, पंचायत समिती सदस्य किसन शिंदे, सरपंच रूपाली गरदरे, उपसरपंच योगेश वडघुले, राहूच्या सरपंच मनीषा नवले, डी. बी. झाडगे, अर्जुन स्वामी,गणेश खुटवड, विजय शिर्के, अप्पा ठाकर, संपत नरसाळे, संतोष गरदरे यांच्यासह विविध खात्याचे पदाधिकारी, शेतकरी, मजूर, तसेच महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.
टाकळी भीमाला ‘शासन आपल्या दारी’
By admin | Published: April 20, 2016 12:48 AM