पिंपरी : तुमचे पार्सल मुंबई कस्टममध्ये अडकले आहे. त्यात ड्रग्स व पासपोर्ट असल्याचे सांगून एका तरुणाची ७ लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार १ ते २ एप्रिल या कालावधीत बाणेर येथे ऑनलाईन पद्धतीने घडला आहे. याप्रकरणी तरुणाने गुरुवारी (दि.४) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ८१२७३२५८१० या मोबाईल क्रमांकावरून बोलणारा मनोज अग्रवाल, रवीचंद्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना मनोज नावाच्या व्यक्तीने फोन करुन तुमचे पार्सल कस्टम ऑफीसमध्ये अडकले असल्याचे सांगितले. त्यामध्ये ५ पासपोर्ट, ३ क्रेडीट कार्ड, ४ किलो कपडे, १ लॅपटॉप, २०० ग्रॅम एम.डी.एम.ए.ड्रग्स असल्याचे सांगितले. फिर्यादीला स्काईप ॲप डाऊनलोड करण्यास सांगून त्याद्वारे फिर्यादीला व्हिडीओ कॉल करायला सांगितले. त्यानंतर त्यांचे लोकेशन ट्रेस केले व ते कुठे जातात, कोणाला बोलतात यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. यातून सुटका करायची असेल तर ७ लाख ९६ हजार ४२५ रुपयांचे आरटीजीएसद्वारे पैसे पाठवण्यास सांगून फसवणूक केली आहे. हिंजवडी पोलिस पुढील तपास करत आहेत.
पार्सल कस्टम ऑफीसमध्ये अडकल्याचे सांगून तरुणाची ८ लाख रुपयांची फसवणूक
By प्रकाश गायकर | Published: April 05, 2024 5:42 PM