पुणे : शाळेतील किशोरवयीन मुलींची मासिक पाळीमुळे होणारी कुचंबणा टाळणे तसेच याविषयी समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागाने मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तीन स्तरावर ‘स्वच्छ विद्यालय स्वच्छ महाराष्ट्र टास्क फोर्स’ स्थापन करण्यात येणार आहे.देशात मासिक पाळी या विषयावर अनेक समज-गैरसमज असल्याने मासिक पाळी या विषयावर चर्चा करणेही टाळले जाते. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात युनिसेफच्या एका सर्वेक्षणात ६० ते ७० टक्के किशोरवयीन मुली पाळीच्या दरम्यान शाळेत जात नाहीत. अशा परिस्थितीत मुलींना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ मिशनमध्ये याचाही समावेश करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्यातील जालना, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, औरंगाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांत युनिसेफच्या सहायाने मासिक पाळी व्यवस्थापन उपक्रम राबविला आहे.
या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महापालिका, जिल्हा, नगरपालिका स्तरावर स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन केला जाणार आहे. अनुक्रमे पालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्याधिकारी हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील. या फोर्स मध्ये अन्य सहा सदस्य असतील. मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमाची अंमलबजावणी, नियंत्रण, आढावा घेण्याची जबाबदारी या टास्क फोर्सवर असेल. मुलींना मासिक पाळी व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्याबरोबर शाळांमध्ये आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत समन्वय साधण्याची जबाबदारी ही समिती करेल. या कार्यक्रमामध्ये पालकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.