पुणे : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची शक्यता गृहीत धरून पुणे महानगरपालिकेमार्फत शहरातील 'बालरोग तज्ज्ञां'चा टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
तिसर्या लाटेमध्ये लहान मुले अधिक बाधित होण्याची शक्यता वैद्यकिय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पालिकेने कोरोनाबाधित लहान मुलांसाठी येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात ५० बेडचा स्वतंत्र कक्ष उभा केला जात आहे. आमदार सुनिल टिंगरे यांनी त्याकरिता निधी उपलब्ध करून दिला आहे. पालिकेने बालरोग तज्ज्ञ व सहाय्यक भरतीसाठी जाहिरात देखील दिली आहे.
याबाबत बोलताना महापौर मोहोळ म्हणाले की, मंगळवारी शहरातील बालरोग तज्ज्ञांशी ऑनलाईन चर्चा होणार आहे. कोरोना व अन्य आजारांसंबधी माहिती घेतली जाईल. लहान मुलांना कोरोनापासून दूर ठेवण्याच्यादृष्टीने उपाययोजना, बाधित मुलांवर उपचार व लसीकरण आदींकरिता बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात येईल.