पुणे: टास्क पूर्ण केल्यास आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल अशी बतावणी तिघांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत बुधवारी (दि. ३) संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- सदाशिव पेठेत राहणाऱ्या उमेश यशवंत पासलकर (वय- ४१) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रथमेश संजय भिलारे (वय-२७, रा. दत्तवाडी) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २१ जानेवारी २०१९ ते १६ फेब्रुवारी २०२३ यादरम्यानच्या काळात घडला आहे. आरोपीने शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा मिळवून देतो असे सांगून फिर्यादींकडून तब्बल ५७ लाख ३४ हजार रुपये घेतले. मात्र कोणताही परतावा दिला नाही आणि दिलेली रक्कम सुद्धा परत केली नाही म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- हडपसर परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. अनोळखी व्यक्तींनी टास्क पूर्ण केल्यावर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेकडून प्रीपेड टास्कच्या नावाखाली ८ लाख ३१ हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे.
- मांजरी परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी फिर्यादींच्या मोबाईलचा ऍक्सेस मिळवून ४ लाख १५ हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले आहेत.