पुणे: टाटा मोटर्स या भारतातील सर्वांत मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज पुणे जिल्हा परिषदेला ५१ टाटा विंगर रुग्णवाहिका डिलिव्हर केल्या. हस्तांतर समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. ही ५१ टाटा विंगर रुग्णवाहिकांची डिलिव्हरी हा जिल्हा परिषदेने दिलेल्या एका मोठ्या ऑर्डरचा भाग आहे आणि कोविड-१९ रुग्णांना सहाय्य पुरवण्यासाठी या रुग्णवाहिका पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे तैनात केल्या जाणार आहेत. गव्हर्न्मेंट ई-मार्केटप्लेसखाली देण्यात आलेल्या कार्यादेशासाठी (ऑर्डर) बोली लावत टाटा मोटर्सने हा कार्यादेश प्राप्त केला. त्यानुसार तयार करण्यात आलेली ही वाहने एआयएस 125 पार्ट 1नुसार रुग्णांसाठी खास डिझाइन करण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेचे आणि टाटा मोटर्सचे अधिकारी हस्तांतर समारंभाला उपस्थित होते.
टाटा मोटर्सच्या एससीव्ही प्रोडक्ट लाइनचे उपाध्यक्ष श्री. विनय पाठक यावेळी म्हणाले, “टाटा विंगर प्लॅटफॉर्म हा खूपच वैविध्यपूर्ण आहे आणि अनेकविध उपाययोजनांसाठी अत्यंत अनुकूल आहे. हा देशातील सर्वांत यशस्वी रुग्णवाहिका प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे आणि आत्तापर्यंत हजारो जणांचे प्राण वाचवण्यात या प्लॅटफॉर्मने मदत केली आहे. बीएस6 स्वरूपात या वाहनाचे मूल्य आणखी वाढले आहे आणि ते रुग्णांच्या वाहतुकीसाठी आदर्श वाहन झाले आहे. कोविड-१९शी लढा देण्याच्या देशाच्या प्रयत्नात टाटा मोटर्सही सहभागी आहे आणि सर्वांना अधिक चांगली व जलद आरोग्यसेवा पुरवण्यात सरकारला मदत करण्याचा निश्चय आम्ही केला आहे.”
पुणे जिल्हा परिषदेला डिलिव्हर करण्यात आलेल्या टाटा विंगर बीएस6 रुग्णवाहिका चालकाला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने विकसित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये चालकासाठी पार्टिशन देण्यात आले आहे. टाटा विंगरच्या सपाट टॉर्क वक्रामुळे गीअर शिफ्ट्स कमीतकमी करावे लागतात. गीअर शिफ्ट इंडिकेटर आणि इको स्विचमुळे इंधन कार्यक्षमता उत्तम राखली जाते. या वाहनाच्या मोनोकुप चेसिसमुळे रुग्णांची वाहतूक अधिक सुरळीत होते आणि अरुंद रस्त्यांवरूनही हे वाहन सहजपणे नेता येते.