पिंपरी : टाटा मोटर्स कंपनीचा १८ महिन्यांपासून रखडलेला वेतनवाढीचा करार मार्गी लागणार असून, तीन वर्षांचा हा करार असणार आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर वेतनवाढ करारावर स्वाक्षरी होणार असल्याने टाटा मोटर्समधील कामगारांचा गुढी पाडवा अधिकच गोड होणार आहे. पिंपरी येथील टाटा मोटर्स कंपनीचा वेतनवाढ करार १ सप्टेंबर २०१५ पासून प्रलंबित आहे. कंपनी व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनमध्ये काही मुद्द्यांवर सहमती न झाल्याने करारासंदर्भात अनेक बैठका फिसकटल्या आहेत. वेतनवाढ करार तीन वर्षांसाठीचा असावा, अशी युनियनची प्रमुख मागणी आहे. दरम्यान, १७ मार्चला कंपनी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी बोलाविले होते. मात्र, या बैठकीतही तोडगा न निघाल्याने कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन सुरू केले. लाल शर्ट परिधान करून व्यवस्थापनाचा निषेध नोंदविला. तसेच यापूर्वीही कामगारांनी जेवणावर बहिष्कार घातला होता. दरम्यान, २० मार्चला टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा आणि नवनिर्वाचित अध्यक्ष एन. चंद्र्रशेखरन यांनी टाटा मोटर्सच्या पिंपरी प्रकल्पातील कामगारांची भेट घेऊन संवाद साधला. कामगारांचे प्रश्न जाणून घेतले. यासह प्रलंबित वेतनकरार लवकरात लवकर मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले. यानंतर चार दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन कामगारांनी स्थगित केले होते. टाटा मोटर्स कंपनीत सात हजार कामगार आहेत.मात्र, वेतनवाढ करार रखडल्याने आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. दरम्यान, आता गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर त्रैवार्षिक करारावर स्वाक्षरी होणार असल्याने कामगारांचा गुढी पाडवा अधिकच गोड होणार आहे. या वृत्तास युनियनच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील दुजोरा दिला. यामुळे कामगारांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)
टाटा मोटर्स कामगारांचा गुढी पाडवा होणार गोड
By admin | Published: March 27, 2017 3:01 AM