पुणे : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता टाटा कंपनीच्या मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही आहेत. यासंदर्भात आता टाटा कंपनीनेही सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. धरणाची उंची वाढवून निर्माण होणाऱ्या अतिरिक्त पाण्यातून ही गरज पूर्ण करता येणे शक्य असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच टाटा कंपनी व राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी मुळशी धरण टप्पा एक व दोनमधील पिण्याच्या पाण्यासंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. यावेळी टाटा कंपनी, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त आदी अधिकारी उपस्थित होते.
मुळशी धरणाच्या टप्पा एकमध्ये धरणाची उंची एक मीटरने वाढविण्यास टाटा कंपनीने तत्त्वतः होकार दर्शवला आहे. याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडून टाटा कंपनीला सादर करण्यात येणार आहे. धरणाची उंची वाढवल्यानंतर निर्माण होणाऱ्या पाण्याच्या फुगवट्यामुळे काही जमीन पाण्याखाली जाणार आहे. यातील ८० टक्के जमीन ही टाटा कंपनीच्या मालकीची असून, उर्वरित २० टक्के जमीन शेतकऱ्यांची आहे. ही जमीन संपादित करण्यासाठी राज्य सरकार मदत करेल, असे आश्वासन पवार यांनी टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.
याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिले. या निर्णयामुळे धरणाची क्षमता वाढल्यानंतर निर्माण होणारे अतिरिक्त पाणी पुणे शहराला मिळण्याची शक्यता वाढली आहे.
धरणाशेजारील ५० गावांनाही पाणी :
मुळशी धरणाच्या दुसऱ्या टप्प्यात धरणाशेजारील ५० गावांच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. याबाबत पवार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. कंपनीच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. त्यामुळे कंपनीने या ५० गावांना पाणी देण्याचे मान्य केले आहे.