पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अंतर्गत गोटातला शिलेदार असणाऱ्या वसंत मोरे यांना समाजमाध्यमांच्या बेसुमार वापरानेच अडचणीत आणले असल्याची चर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांवर सातत्याने चमकत राहण्याची हौसच त्यांना नडली असल्याचे सांगण्यात येते.
सत्तेत नसतानाही कात्रजमधील प्रभागात सातत्याने केलेल्या वेगवेगळ्या विकासकामांमधून नगरसेवक वसंत मोरे यांचे नाव कायमच प्रसिद्धीच्या झोतात राहिले. समाज माध्यमांचा त्यांच्याकडून वापर होत होताच, पण शहराध्यक्ष झाल्यानंतर मात्र सातत्याने त्यांच्या जयजयकाराचे, गुणगौरवाचे व्हिडिओ फेसबुकवरून अपलोड होऊ लागले. महिला ओवाळताना, लहान मुले तात्या तात्या घोषणा देताना, एखादी युवती तक्रार सांगताना अशा प्रकारच्या व्हिडिओ लोकप्रिय होऊन त्यांना लाईक, कमेंटद्वारे नागरिकांची जोरदार पसंतीही मिळू लागली.
दरम्यानच्या काळात मनसेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यातही मोरे यांनी पुढाकार घेतला. गणेश कला क्रीडा मंदिरात त्यांनी तो यशस्वीही करून दाखवला. त्याच कार्यक्रमात त्यांनी सभागृहातही त्यांच्या कार्यपद्धतीचे म्हणून टेम्पोला लावलेल्या जॅमरवर हातोडा मारणारे, महापालिका अधिकाऱ्यांच्या वाहनांची काच दंडुका मारून फोडण्याचे व्हिडिओ मोठ्या स्क्रिनवर दाखवले. तिथेच राज यांची भुवई उंचावली असल्याचे आता मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून खासगीत सांगण्यात येते.
भोंगे काढण्याच्या इशाऱ्याला जाहीरपणे विरोध व तोही राज किंवा मुंबईतील अन्य वरिष्ठांबरोबर संपर्क न साधता हा मोरे यांचा अखेरचा गुन्हा ठरला व त्याची परिणती त्यांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात झाली, अशी माहिती काही पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतरच्या मुंबईच्या बैठकीत खुद्द राज यांनीच मोरे यांना उठसूठ माध्यमांबरोबर बोलण्याची गरज नाही, असे बजावले असल्याचे समजते. त्याचबरोबर सोशल मीडियाचा वापरावरही मर्यादा आणण्याचा आदेश त्यांना दिला असल्याची माहिती मिळाली.