पुणे: तूम्ही शिवसेनेत होते हे माहिती आहे व का सोडली हेही माहिती आहे. आता आपण सगळे एकत्रच आहोत. चांगले काम करा व मोठे व्हा अशा शब्दांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कसबा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर यांना शाबासकी दिली. चांगला धडा शिकवलास असे म्हणत ठाकरे यांनी धंगेकर यांचे कौतूक केले.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत धंगेकर विजयी झाले. ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते. विजयानंतर ते आघाडीतील विविध पक्षप्रमुखांची भेट घेत आहेत. बुधवारी सकाळी ११ वाजता त्यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. माजी मंत्री आदित्य ठाकरे हेही यावेळी उपस्थित होते. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, आमदार सचिन आहेर, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यावेळी उपस्थित होते.
ठाकरे यांनी धंगेकर यांच्याकडून त्यांच्या विजयाची माहिती घेतली. याच इर्ष्येने आता यापुढील सर्व निवडणूका लढवाव्या लागणार आहेत. जनतेच्या मनात भारतीय जनता पक्ष व गद्दारांबाबत राग आहे. तो कसब्यात मतपेटीतून व्यक्त झाला. यापुढेही त्यांना अशाच पराभवांना तोंड द्यावे लागणार आहे असे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी धंगेकर यांच्या प्रचारसभेत आभासी पद्धतीने भाग घेतला होता तर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यासाठी मोठी रॅली काढून त्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. धंगेकर यांच्या राजकीय कामाची सुरूवातच शिवसेनेपासून झाली आहे. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर तेही त्यांच्याबरोबर बाहेर पडले. त्यानंतर मागील महापालिका निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडत काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्विकारले होते. आताच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ते काँग्रेसचे अधिकृत उमेवदावर होते. त्यात ते निवडून आले.