पुणे : एका बड्या मोबाईल कंपनीकडे तब्बल ३०० कोटींच्या कराची थकबाकी असतानाही १३ कोटींच्या दुबार करमाफीचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. या कं पनीच्या ३०० पेक्षा अधिक टॉवरला कर आकारणी केली जावे असे प्रस्ताव प्रशासनाकडे आलेले आहेत. त्यांच्या कराची रक्कम अद्याप भरलेली नसतानाही कंपनीच्या करमाफीचा घाट घालण्यात आला आहे.
पालिकेची मोबाईल कंपन्यांकडे दोन हजार कोटींची थकबाकी आहे. या थकबाकीविषयक वाद न्यायालयात सुरु आहे. पालिकेने दुबार कर लावल्याचा आरोप मोबाईल कंपन्यांनी केला असून त्यातीलच एका कंपनीकडे असलेली १३ कोटींची थकबाकी निर्लेखित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या कंपनीचा दुबार कर यद्द झाल्यानंतर त्याच कंपनीला ३०० किलोमीटर खोदाईची परवानगी देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. याच कंपनीने पालिकेकडे नव्याने ३०० टॉवरला कर आकारणी करावी असा प्रस्ताव दिला आहे. मिळकतकर विभागाने या प्रस्तावांची छाननी करुन कराची रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्याप कर जमा झालेला नाही.
====
टॉवर तयार करतानाच प्रस्ताव का दिले नाहीत
कंपनीने कर आकारणीसाठी प्रस्ताव दिलेले ३०० टॉवर दोन ते तीन वर्षे जुने आहेत. त्यामुळे एवढी वर्षे कर आकारणी का झाली नाही, कंपनीनेही हे टॉवर तयार करतानाच प्रस्ताव का दिले नाहीत असे प्रश्न निर्माण झाले आहेत. कंपनीकडून कर चुकवेगिरीसाठी टॉवरची लपवाछपवी करण्यात आली का अशी शंका उपस्थित केली जात आहे.