लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कर थकबाकीसाठी सामान्य नागरिकांच्या घरासमोर बँड लावणाऱ्या महापालिकेने व्यापाऱ्यांना मात्र सोयीस्कररीत्या बाजूला सारले असल्याची माहिती हाती आली आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तब्बल ४१ कोटी रुपयांची कर थकबाकी असून, यात व्यापारी आणि व्यावसायिकांचा अधिक भरणा आहे. महापालिकेकडून व्यावसायिक, बड्या कंपन्या, काही समाजांची ट्रस्ट यांची थकबाकी वसुली आणि सामान्य नागरिकांची वसुली यासाठी वेगवेगळे धोरण राबविले जात असल्याचे यातून दिसून येत आहे. शहरात भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मोठ्या प्रमाणावर व्यापारी आणि व्यावसायिक संकुले येतात. त्यात टिंबर मार्केट परिसरातील व्यापारी आणि व्यावसायिकांचा देखील समावेश आहे. यात अगदी सरकारी दूरध्वनी कंपनीबरोबरच बड्या व्यावसायिक मोबाईल कंपन्यांच्या कार्यालयांचादेखील कर थकीत आहे. विविध धर्मीयांकडून चालविण्यात येणाऱ्या ट्रस्ट आणि समाज कार्यालयांच्या कराचादेखील यात समावेश असून, बांधकाम व्यावसायिक आणि बांधकाम क्षेत्रातील कंपन्यादेखील थकबाकीदार आहेत.रास्ता पेठेतील एका बड्या रुग्णालयाच्या नावे ९ लाख ७० हजार रुपयांचा कर थकीत असून, इन्फ्रा कंपन्यांनीदेखील कोट्यवधींचा कर थकविला असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते अजहर खान यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन कार्यालयाच्या वतीने मार्च २०१७ अखेरपर्यंत भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत निवासी आणि बिगर निवासी मिळकत कराची ४१ कोटी ८ लाख ५ हजार रुपयांची थकबाकी असल्याचे सांगण्यात आले आहे. या माहिती अधिकाराचे उत्तर २२ जून २०१७ रोजी देण्यात आले असल्याने, तोपर्यंत त्याची वसुलीदेखील करण्यात आली नसल्याचे स्पष्ट होते. महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी बँड पथक स्थापन केले आहे. ते बँड पथक थकबाकीदाराच्या घरासमोर जाऊन बँड वाजविते. समाज लज्जेपोटी संबंधित व्यक्ती करभरणा करेल हा उद्देश या मागे असतो. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक, कंपन्यांची कार्यालये, समाज संस्था, प्रतिष्ठित समजली जाणारी रुग्णालये यांच्यासमोर महापालिका करवसुलीचा बँड वाजविण्याचे धारिष्ट्य केव्हा दाखविणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन आस्थापनांचे साडेचार कोटींचे करवर्धन सेव्हन लव्हज् चौकातील एका बंधू समाजाच्या नावे असणाऱ्या दोन अस्थापनांकडे कर थकबाकीचे सातत्याने वर्धन होत आहे. त्यांची थकबाकी ४ कोटी ४७ लाख रुपयांची आहे. पाच इन्फ्रा कंपन्यांकडे प्रत्येकी ३५ ते ३९ लाख रुपयांची थकबाकी आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या ४१ कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी तब्बल १० कोटी ५७ लाख ४५ हजार रुपयांची थकबाकी केवळ १९ व्यापारी, व्यावसायिक, कंपन्या आणि संस्थांकडे आहे.शहरातील थकबाकी १८०० कोटींच्या घरातशहरात मार्च २०१७ अखेरीस तब्बल अठराशे चौदा कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यातील ४१ कोटी रुपये केवळ भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील आहेत. एका क्षेत्रीय कार्यालयातील ही थकबाकीची आकडेवारी असून, त्यात व्यावसायिक आणि व्यापारी थकबाकीचा भरणा अधिक आहे. इतर, क्षेत्रीय कार्यालयांत देखील व्यावसायिक आणि व्यापारी थकबाकीचा टक्का अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. महानगरपालिका सामान्य नागरिकांच्या करवसुलीसाठी बँड वाजविते. बडे व्यापारी, संस्था आणि कंपन्यांची थकबाकी कोट्यवधींच्या घरात गेली तरी दुर्लक्ष करते. ही सापत्न वागणुक थांबविली पाहिजे. - अजहर खान, माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते
‘करवसुली बँड’ सामान्यांसाठीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 4:12 AM