पुणे : पुणे विभागातून तब्बल ७५ हजार कोटी रुपयांच्या कर संकलनाचे उद्दीष्ट ठेवले आहे. करदात्यांची संख्या ७६ लाखांवरुन १ कोटी पर्यंत वाढविण्याचे लक्ष्य असल्याची माहिती प्राप्तीकर विभागाच्या आयुक्त अनुराधा भाटिया यांनी दिली. प्राप्तीकर विभागाच्या वर्धापनदिनानिमित्त नेहरू मेमोरियल हॉल येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
प्राप्तीकर विभागाचे महासंचालक (इनव्हेस्टिगेशन) एम. के. दुबे, डॉ. जयश्री तोडकर, डॉ. प्रमोद त्रिपाठी, नरेंद्र गोइंर्दानी यावेळी उपस्थित होते. भाटिया म्हणाल्या, पाच वर्षांपूर्वी पुणे विभागातून २९ हजार कोटी रुपयांचे कर संकलन झाले होते. गेल्यावर्षी त्यात ५८ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली. पुणे शहराची आयटी, अॅटोमोबाईल, कृषी प्रक्रिया आणि रियल इस्टेट या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे प्राप्तीकर विभागाची कामगिरीही उंचावली आहे. पुणे विभागात २०१८-१९ मध्ये ७६ लाख जणांनी ५८ हजार कोटीचा कर भरणा केला होता.
यंदा पुणे विभागातून १ कोटी करदात्यांकडून ७५ हजार कोटी रुपयांचा प्राप्तीकर जमा करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी कर भरावा यासाठी १ ऑगस्ट पासून प्राप्तीकर विभागाकडून ई फॉर्म भरून घेण्यासाठी शिबीर आयोजित केले जाईल. प्राप्तीकर हा १८६० पासूनचा तब्बल १५९ वर्षे जुना कायदा असून, तो देशासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे भाटिया यांनी सांगितले.