पुणे - सध्याच्या जमान्यात वाहन चालकांची बेपर्वाई, निदर्य मानसिकतेच्या गोष्टी कानावर पडत असताना पुण्यामध्ये एक टॅक्सीचालक आणि प्रवाशाने आपल्या कृतीमधून समाजासमोर एक चांगले उदहारण ठेवले आहे. त्यांनी केलेली कृती अजूनही माणूसकी जिवंत असल्याचे लक्षण आहे. बेदरकारपणे वाहन चालवताना पादचा-याला धडक दिल्यानंतर वाहनचालक लगेच घटनास्थळावरुन पळून गेल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत तसेच जमलेली गर्दी जखमींना मदत करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेते. पुण्यात मात्र बिलकुल याउलट घडले.
रोहित बैरागी यांनी ओला कॅब बुक केली व ते येरवडयाच्या दिशेने चालले होते. त्याचवेळी त्यांना रस्त्यात अपघातात जखमी झालेले जोडपे दिसले. त्यांनी वाहन चालक इंद्रपाल सिंहकडे मदत करशील का ? म्हणून विचारणा केली. इंद्रपालनेही लगेच होकार दिला. दोघांनी मिळून त्या जखमी जोडप्याला उचलून आपल्या गाडीत ठेवले व रुग्णालयात दाखल केले.
बैरागी यांनी 6 नोव्हेंबरला टि्वट करुन वाहनचालक इंद्रपाल सिंहचे कौतुक केले. फार कमी लोक स्वत:च्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून दुस-याला मदत करायला तयार होता. मदतीची गरज असणा-यांना मी सहकार्य केले त्याच मला समाधान आहे असे बैरागी यांनी सांगितले. रोहित यांना जखमी व्यक्तीबद्दल आस्था, आपुलकी होती. आम्ही दोघ मदतीसाठी तयार झालो असे इंद्रपाल सिंह यांनी सांगितले.