पुणे : धर्मनिरपेक्षताच्या नावाखाली हिंदु विद्यार्थी ज्या शाळामध्ये शिकतात, तेथे धार्मिक शिक्षणाला अटकाव केला जाताे. त्यामुळे आजची हिंदू युवापिढी पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे चंगळवाद, व्यसनाधीनता आणि वासनांच्या आहीर जात आहे. त्यामुळे युवापिढीला सुजाण, संस्कारक्षण आणि चारित्र्यसंपन्न करण्यासाठी त्यांना रामायण, महाभारताचे शिक्षण शाळा महाविद्यालयातून देण्यात यावे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडून करण्यात आली.
समितीच्यावतीने झाशीची राणी चाैकात आंदाेलन करण्यात आले त्यावेळी ही मागणी करण्यात आली. त्याचबराेबर सरकारने तात्काळ कायदा करुन राममंदिर उभारावे अशीही जाेरदार मागणी यावेळी करण्यात आली. हिंदूबहुल भारतात श्रीरामजन्मभूमीवर हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार नाकारला जाणे, हे लज्जास्पद आहे. केंद्रात आणि उत्तरप्रदेशात दाेन्ही ठिकाणी भाजपचेच पूर्ण बहुमतातील शासन आहे. त्यामुळे श्रीराम मंदिर उभारणीसाठी संसदेत तात्काळ कायदा बनवून अयाेध्येत भव्य श्रीराम मंदिर उभारावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच भारत धर्मनिरपेक्ष देश आहे असे सांगून मदरशांमध्ये कुराण शिकवले जाते, ख्रिस्ती मिशनरींच्या काॅन्व्हेंट शाळांमध्ये बायबल शिकवले जाते परंतु धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदु विद्यार्थी ज्या शाळांत शिकतात, तेथे धार्मिक शिक्षणाला अटकाव केला जाताे. असा आराेप समितीकडून करण्यात आला आहे. धर्मशिक्षणातून नीतीमत्ता येते. सध्या ते मिळतच नसल्याने समाजात चाेऱ्या, खून, दराेडे, बलात्कार आणि भ्रष्टाचार आदींसारखे गुन्हे वाढले आहेत. त्यामुळे भावी पिढी सुजाण, संस्कारक्षम आणि चारित्र्यसंपन्न करण्यासाठी त्यांना रामायण, महाभारत आदी धर्मग्रंथांचे शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे केंद्रसरकारने हिंदूना त्यांच्या धर्मग्रंथांचे शिक्षण सर्व शाळा - महाविद्यालयांमधून प्रतिदिन देण्यात यावे असे यावेळी सांगण्यात आले.
तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मद्य मांस यांच्या विक्रीवर बंदी घालावी, तसेच हनुमानाच्या जातीवरुन वाद घालणाऱ्यांवर कठाेर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.