पुणे : राज्य शासनाने या वर्षापासून आंतरजिल्हा बदली आॅनलाईन करण्याच्या घोषणेचा पुरता बोजवारा उडाला आहे. पुणे विभागात पात्र शिक्षकांची १ मेपर्यंत अर्ज करण्याची असणारी मुदत आज पूर्ण होत आहे. मात्र, संकेतस्थळावरील पोर्टल बंद राहत असल्याने शिक्षकांची प्रचंड धावपळ सुरू आहे. अर्ज भरण्यासाठी मुदतवाढीची मागणी प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे.ग्रामविकास विभागाने या वर्षापासून आंतरजिल्हा बदल्या जिल्हास्तराऐवजी राज्यस्तरावरून करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यासाठी शासनाकडे कोणतीही पूर्वतयारी नसल्याचा अनुभव शिक्षकांना येत आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी सरलप्रणालीत आॅनलाईन अर्ज करण्यास सुचविण्यात आले आहे, यासाठी शिक्षकांना १ मेपर्यंत अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, सरलप्रणालीतील स्टाफ पोर्टल व ट्रान्स्फर पोर्टल वारंवार बंद राहत असल्याने शिक्षक धास्तावले आहेत.आधीच वर्षानुवर्षे घरापासून दूरवरच्या जिल्ह्यात नोकरी करणारे शिक्षक प्रचंड तणावाखाली आहेत. आंतरजिल्हा बदली अर्जासाठी शिक्षक कायम केल्याची (स्थायित्व लाभ) जिल्हा परिषदेची मंजुरी आवश्यक केली आहे. (प्रतिनिधी)
आॅनलाइनच्या घोषणेने शिक्षक त्रस्त
By admin | Published: May 03, 2017 2:10 AM