पुणे : १२ वर्षीय मुलगा क्लासला गेला असताना बाथरूममध्ये गेला. त्यावेळी त्याच्या एका मित्राने बाहेरून बाथरूमचा दरवाजा लावल्याने संबंधित मुलाने दरवाजा जोरात वाजवला. या कारणावरून क्लासच्या शिक्षिकेने विद्यार्थ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. याप्रकरणी संबंधित शिक्षिकेवर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मनोज श्रीराम यावलकर (५२, रा. चिंचवड) यांनी आरोपी शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार २ जुलै रोजी कोथरूडमधील भुसारी कॉलनी या ठिकाणी घडला आहे.
तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा १२ वर्षांचा मुलगा संबंधित शिक्षिकेकडे क्लासला गेला होता. त्यावेळी तो बाथरूममध्ये गेला असताना, त्याच्या एका मित्राने बाथरूमचा दरवाजा बाहेरून लावला. त्यामुळे मुलाने दरवाजात जोरजोरात वाजवल्याने, क्लास घेणाऱ्या संबंधित शिक्षिकेने ‘तुला संस्कार नाहीत का शिकवले?, तुला अक्कल नाही का? तुला नागडा करून झोपडपट्टीत फिरवीन आणि पोलिसात देईन,’ अशी धमकी देऊन त्यांच्या हातात असलेल्या रॉडने मुलाच्या हातावर जोरजोरात फटके मारून जाणीवपूर्वक त्याला दुखापत केली. हा प्रकार मुलाने वडिलांना सांगितल्यावर त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठत संबंधित शिक्षिकेविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास कोथरूड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पांढरे करीत आहे.