पुणे : इंग्रजी ही पुढील काळाची गरज असल्याचे ओळखून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका असलेली आई आशा आणि महाविद्यालयात प्राचार्य असलेले वडील जी. आर. म्हैसेकर यांनी इंग्रजीची गोडी लावली, तसेच शालेय शिक्षक साबदे यांनी इंग्रजी भाषा शिकण्यास प्रोत्साहन दिले, तर महाविद्यालयीन काळात वरदाचार्य आणि के. टी. सिद्दीकी यांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. माझे गणित थोडे कच्चे होते. शिक्षक हंबरडे यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे मला ९० टक्के गुण गणितात मिळाले. बाराळे, पराशर या शिक्षकांनी भौतिकशास्त्राची व लोहगावकर आणि श्रीमती सिंग यांनी जैवविज्ञानाची गोडी लावली. या सर्व शिक्षकांनी दिलेल्या योगदानामुळे आज मी इथंवर पोहोचल्याची भावना पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. ...माझे प्राथमिक शिक्षण नांदेडमधील जिजामाता स्कूल येथे झाले. पीपल्स कॉलेजमध्ये महाविद्यालयापर्यंत शिक्षण घेतले. पुढे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात पदवी शिक्षण पूर्ण केले. आई-वडील दोघेही शिक्षक असल्याने शिक्षणाचे पहिले बाळकडू घरातूनच मिळाले. शालेय ते महाविद्यालयीन शिक्षण घेताना प्रत्येक टप्प्यावर मला चांगले गुरू मिळाले. आजकाल शिक्षकांनी विद्यार्थ्याला मारल्यास त्याचा खूप बाऊ केला जातो. मात्र, शालेय वयात मीदेखील शिक्षकांचा मार खाल्ला आहे. त्यामुळेच मी घडलो आणि आम्हा विद्यार्थ्यांना त्या मारामुळेच शिस्त लागल्याचे आज जाणवते. आमच्यावेळी डॉक्टर आणि इंजिनिअर याच पेशात जाण्यास प्रोत्साहन दिले जात होते. मात्र, वडिलांनी प्रशासकीय सेवेत जाण्यास सुचविले होते. ........शालेय शिक्षक आजही भेटतात... नांदेडला ज्या जिजामाता शाळेत मी शिकलो तेथे नांदेड आयुक्त म्हणून रुजू झाल्यावर गेलो होतो. त्यावेळी अनेक शिक्षकांची भेट झाली. पुण्याचा विभागीय आयुक्त म्हणून पदभार घेतल्यानंतर शिक्षक साबदे यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांना मी तुमच्याकडे येतो असे सांगितले. मात्र, त्यांनी नम्रपणे माझी विनंती नाकारत स्वत: कार्यालयात येणे पसंत केले. त्यांचे वय ८० च्या पुढे आहे. मात्र, मला त्या खुर्चीत बसलेले त्यांना पाहायचे होते. म्हणूनच ते कार्यालयात आले.
शिक्षक दिन : शिक्षकांमुळे सुटले गणित-इंग्रजीचे कोडे : डॉ. दीपक म्हैसेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 12:15 PM
आमच्यावेळी डॉक्टर आणि इंजिनिअर याच पेशात जाण्यास प्रोत्साहन दिले जात होते. मात्र, वडिलांनी प्रशासकीय सेवेत जाण्यास सुचविले होते.
ठळक मुद्देप्राथमिक आणि महाविद्यालयातील शिक्षकांचे घडविण्यात योगदान