चाकण : मेदनकरवाडी (ता.खेड) येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने इयत्ता सातवीच्या वर्गातील सहा ते सात मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी, मुख्याध्यापक व दोन महिला शिक्षकांवर माहिती लपविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी विश्वास चंदर सोनवणे (रासे केंद्र प्रमुख) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी लिंबाजी डोंबे (वय ५०, रा. मेदनकरवाडी, चाकण, ता.खेड, जि. पुणे) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून हा प्रकार जिल्हा परिषदेच्या शाळेत व त्यांच्या घरी घेत असलेल्या खासगी क्लासमध्ये अनेक महिन्यांपासून नव्हे तर दोन वर्षांपासून चालू होता. याबाबत वरिष्ठांकडे गुप्त तक्रार गेल्यानंतर अधिकारी शाळेत चौकशीसाठी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शाळेमध्ये हा प्रकार १ आॅक्टोबरला समजला होता, असे माजी सरपंच रामदास मेदनकर यांनी सांगितले. तरीही शिक्षकांनी ही माहिती आमच्यापासून दडवून ठेवल्याचे त्यांनी सांगितले. पीडित मुलींच्या पालकांना बोलावून जबाब घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.मेदनकरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत एकूण ६०० पटसंख्या असून शाळेत केवळ ३४ मुले स्थानिक व इतर मुले हि बाहेर गावाहून आलेल्या कामगार वगार्तील आहे. या प्रकारामुळे मुली भयभयीत झाल्या असून त्यांनी भीतीपोटी हा प्रकार अद्याप पालकांना सांगितला नाही. मात्र शाळेतील दोन शिक्षिकांना हा प्रकार मुलींनी सांगितला होता. या शिक्षकाकडे इयत्ता सातवीची ‘ब’ तुकडी शिकवण्यासाठी होती. हा प्रकार कळताच मुख्याध्यापकांनी त्यांच्याकडून हा वर्ग काढून घेऊन मुलांचा वर्ग दिला होता. खेड पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी इंदिरा अस्वार यांनी शाळेत भेट देऊन मुलींचे जबाब घेतले आहेत. वरिष्ठ अधिकारी शाळेत चौकशीसाठी आले असता संबंधित शिक्षकाला चक्कर आल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथोमपचार घेऊन नंतर सूर्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्या शिक्षकाला हृदय विकाराचा तीव्र झटका आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस पुढील तपास करीत आहे. उशिरा पर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम चालू असल्याने आणखी किती जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला, हे समजू शकले नाही.खेड तालुक्याच्या गट विकासअधिकारी इंदिरा आस्वार यांनी या घटनेचा अहवाल जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांना पाठविला. हा अहवाल तपासून मांढरे यांनी चारही शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे सांगितले.