राजगुरुनगर : पुणे जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षकाची आपसी जिल्हाबाह्य बदली करून तब्बल ६ महिने झाले तरी त्याला कार्यमुक्त करण्यात आले नाही. त्याच्या जागेवर आलेल्या शिक्षिकेस दुसऱ्याच ठिकाणी रुजू करून घेण्यात आल्याचा प्रकार खेड तालुक्यात घडला आहे. या गैरप्रकाराबाबत शेवटी एका आमदारांनी शिक्षणमंत्र्यांना पत्र दिले, तरी परिस्थिती तशीच आहे. अशा मनमानी कारभाराविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा प्राथमिक शिक्षक समितीने दिला आहे. शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ हा नेहमीचा विषय पंचायत समितीत असतो. त्यासाठी शासनाने गेल्या काही वर्षांपासून आॅनलाईन बदल्या करायला सुरुवात केली. तरीही प्रशासन अधूनमधून घोळ घालीत असते. खेड तालुक्यातील राहुल बोरसे या शिक्षकाची आपसी बदली औरंगाबाद जिल्ह्यात २४ आॅक्टोबर २०१५ रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने करण्यात आली. आपली आई सतत आजारी असते म्हणून त्यांनी जवळपास बदली मागितली होती. परंतु त्यांना खेड पंचायत समितीने अद्यापही औरंगाबाद येथे जाण्यासाठी कार्यमुक्त केलेले नाही. विशेष म्हणजे आपसी बदली असल्याने त्यांच्या जागेवर आलेल्या प्रणाली नेहुरकर या शिक्षिका खेड तालुक्यात रुजू झाल्या. पण त्यांना बोरसे यांची शाळा न देता दुसरीच शाळा देण्यात आली. खरेतर आपसी बदलीमध्ये एकमेकांची शाळा परस्परांना देणे अंतर्भूत आहे, तरीही जिल्हा परिषद प्रशासनाने याबाबत घोळ घातला आहे आणि नेहुरकर यांना वेगळीच शाळा दिली आहे. याबाबत खेडच्या गटशिक्षण अधिकारी अश्विनी सोनवणे म्हणाल्या, संबंधित बदली झालेल्या शिक्षकाच्या शाळेत तेच एकमेव शिक्षक असल्याने शाळा रिकामी ठेवून त्यांना कार्यमुक्त करता येणे शक्य झालेले नाही. त्यांच्या जागेवर आलेल्या शिक्षिका यांना जिल्हा परिषद प्रशासनाने आदेशात जी शाळा दिली , त्या शाळेवर त्यांना पाठविण्यात आले आहे.' (वार्ताहर)
शिक्षक आपसीबदलीतही मनमानी
By admin | Published: March 03, 2016 1:36 AM