पुणे: शैक्षणिक वाटचालीत शिक्षक-विद्यार्थ्यांसाठी परमेश्वराची भूमिका बजावत असतात. नवी सक्षम पिढी घडविण्याचे काम ते अविरतपणे करतात. शिक्षकांचे ऋण प्रत्येक विद्यार्थ्यांवर कायमचे असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या भावे स्कूलमधील शिक्षक सुधाकर जगताप यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित केलेल्या शुभेच्छा समारंभात पोतदार बोलत होते. यावेळी सह सचिव व भावे हायस्कूलचे सुधीर गाडे तसेच त्यांचे कुटुंबिय, बंधू दिनकर जगताप आणि शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
गाडे म्हणाले, जगताप सर हाडाचे शिक्षक असून कडक शिस्तीचे भोक्ते आहेत. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. शाळेचे मुख्याध्यापक बी.डी.शिंदे यांनी भावे हायस्कूलच्या वाटचालीत जगताप यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगून त्यांच्याविषयी कौतुकोद्गार काढले.
यावेळी सुधाकर जगताप भावूक झाले होते. संस्थेतर्फे मानपत्र, शाल, श्रीफळ देवून जगताप यांचा सन्मान करण्यात आला. ग्रंथपाल जवळगीकर यांनी मानपत्राचे वाचन केले. एम.जी.अनासपुरे, पूजा नांगरे, किशोर हिंगसे, सोनाली चौधरी यांनीं मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक बी.जी.शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन राऊत यांनी केले व राजेंद्र लोखंडे यांनी आभार मानले.
--------------------------