लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महापालिकेच्या कोंढवा येथील संत गाडगे महाराज शाळेतील एक शिक्षिका कोरोना पॉझिटिव्ह आल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून त्या शाळेला चार दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे़ तर संबंधित शिक्षिकेच्या संपर्कात आलेल्या १२ अन्य शिक्षिकांना कोरोना तपासणी करून घेण्यास सांगण्यात आले आहे़ दरम्यान या शाळेत उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना चार दिवस होम क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले आहे़
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील संत गाडगे महाराज शाळेतील १ हजार १६५ विद्यार्थ्यांपैकी, पालकांच्या संमतीने इयत्ता ५ ते ८ पर्यंतच्या वर्गांमध्ये ४६० विद्यार्थी येत होते़ शाळेत येताना या सर्व विद्यार्थ्यांसह, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची नित्याने थर्मल गन, आॅक्सिमिटरव्दारे तपासणी करण्यात येते़ यामध्ये एका शिक्षिकेला कोरोनासदृश लक्षणे असल्याने गुरूवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले़ यामध्ये सदर शिक्षिकाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला़ यामुळे कालपासूनच या शाळेतील विद्यार्थ्यांना चार दिवस सुट्टी देण्यात आली आहे़
सदर शिक्षिकेच्या संपर्कात असलेल्या १२ शिक्षकांची तपासणी वानवडी येथील स्वॅब सेंटरमध्ये आज घेण्यात आली आहे़ या शाळेत एकूण ५५ शिक्षक, १६ बालवाडी शिक्षक व १७ शिक्षकेतर कर्मचारी आहेत़ प्रत्यक्ष उपस्थितीसह आॅनलाईन शाळाही सध्या सुरू असल्याने यापैकी निम्म्ये शिक्षक हे आॅनलाईन क्लास घेत होते व जी शिक्षिका पॉझिटिव्ह आली आहे, त्या बालवाडीच्या इंग्रजी माध्यमाच्या वर्गासाठी नियुक्त होत्या़ यामुळे संसर्ग होण्याचे प्रमाण नगण्य असेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे़
------------------------
प्राथमिक शाळांचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू झाले असून, त्यावेळी महापालिकेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली होती़ शहरातील शाळा सुरू केल्यापासून प्रथमच अशी घटना घडली असून, खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित शाळेला चार दिवस सुट्टी देण्यात आली आहे़ तसेच ही शाळेची इमारत क्षेत्रिय कार्यालयास सांगून निर्जंतुकीकरण करण्यात आली आहे़
आजमितीला शहरातील खाजगी व सरकारी अशा ७८१ प्राथमिक विभागाच्या शाळा सुरू आहेत़ ज्या विद्यार्थ्यांना सर्दी खोकला किंवा कोरोनासदृश लक्षणे आहेत त्यांना शाळेत पाठवू नये़ तसेच शाळांमधील सर्व शिक्षकांनीही अशी लक्षणे असल्यास स्वत:हून कोरोना तपासणी करून घ्यावी व शाळेत येण्याचे टाळावे़
- सुरेश जगताप, अतिरिक्त आयुक्त पुणे मनपा
----------------------