- किरण शिंदे
पुणे : शहरातील कोथरूड परिसरात नर्सरीत शिक्षण घेत असलेल्या एका तीन वर्षीय चिमुरडीला शाळेतील शिक्षकेने धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही चिमुरडी नर्सरीत असताना शाळेतील शिक्षिका केस ओढायची, गालगुच्ची घ्यायची आणि याबाबत कुणाला काही सांगायची नाही असे म्हणून या चिमुरडीला धमकीही द्यायची. याप्रकरणी आता संबंधित 40 वर्षीय शिक्षिकेविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांची तीन वर्षाची चिमुरडी कोथरूडच्या भारती नगर परिसरात असणाऱ्या एका नामांकित नर्सरीत आहे. सुरुवातीला काही दिवस ती अतिशय उत्साहाने शाळेत जायची. मात्र मागील काही दिवसांपासून ही चिमुरडी शाळेत जाण्यास टाळाटाळ करू लागली. शाळेचे नाव काढताच घाबरू लागली. त्यामुळे नक्कीच काहीतरी घडलं असावं असा संशय तिच्या पालकांना आला. त्यानंतर तिच्या पालकांनी या चिमुरडीला विश्वासात घेतलं. तिच्याकडे विचारपूस केली आणि तिच्या पालकांना धक्काच बसला.
चिमुरडीने सांगितल्यानुसार "अंजना टीचर शाळेत केस ओढतात, गालगुच्ची घेतात. हात कापू का? घरच्यांना सांगितल्यास तुला मेणबत्तीचे चटके देईन" असं सांगून धमकावत असल्याचं या चिमुरडीन तिच्या पालकांना सांगितलं. त्यानंतर पालकांनी मात्र कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेला संपूर्ण प्रकार तक्रार स्वरूपात सांगितला. कोथरूड पोलिसांनीही या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या शिक्षिकेविरोधात कारवाई देखील केली आहे.