पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग करणाऱ्या साठ वर्षांच्या शिक्षकालान्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. विशेष न्यायाधीश सोनाली राठोड यांनी हा निकाल दिला. दंडाच्या रकमेतून आठ हजार रुपये पीडित मुलीला भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात संबंधित शिक्षकाविरोधात पीडितेच्या आईने १५ मार्च २०१७ रोजी पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना १५ मार्च २०१७ रोजी घडली होती. आरोपी शिक्षक व त्याची पत्नी खासगी शिकवणी घ्यायचे. पीडित मुलगी व तिची मोठी बहीण या शिकवणीसाठी जायच्या. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी नेहमीप्रमाणे शिकवणीला गेली.
त्यावेळी आरोपीने तिला खोलीत बोलावून पुस्तकातील धडा वाचायला सांगितला. पीडित मुलगी धडा वाचत असताना आरोपी शिक्षकाने तिचा विनयभंग केला. या प्रकाराने घाबरून पीडित मुलगी घरी परतली. त्यावेळी आईने विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आईने पोलिसांकडे धाव घेतली. पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले.
विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी या खटल्यात आठ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यामध्ये पीडित मुलगी, तिची आई आणि तपास अधिकारी सहायक निरीक्षक रत्नमाला सावंत यांनी साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा ठोठावण्यात यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत आरोपीला दंडात्मक शिक्षा ठोठावली.