वाघोली : केस कापायला सांगितले म्हणून आणि प्राचार्यांनी घरी नापास झाल्याचे सांगितल्याचा राग मनात धरून एका विद्यार्थ्याने शिक्षकावर कोयत्याने वार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साठेआठ वाजता वाडेबोल्हाई येथील जोगेश्वरी माता विद्यालयात घडली. या हल्ल्यात शिक्षकाला वाचविण्यासाठी गेलेला एक शिक्षकही गंभीर जखमी झाला आहे. हल्ला करून विद्यार्थी पसार झाला. लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील पोपट भोर (वय १९, रा. भोरवस्ती, वाडेबोल्हाई) असे शिक्षकावर हल्ला करणा-या विद्यार्थ्याचे नाव आहे. धनंजय दिलीप आबनावे (रा. फुरसुंगी) हे शिक्षक गंभीर जखमी झाले असून, त्यांचा विद्यार्थ्यापासून बचाव करण्यासाठी गेलेले दर्शन वाल्मिक चौधरी (रा. वाडेबोल्हाई) हे शिक्षकही जखमी झाले आहते. दोन्ही शिक्षकांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
याबाबत माहिती अशी की, जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या अकरावी कला शाखेमध्ये सुनील शिकतो. गेल्यावर्षीच भोर याने केसनंद येथील शाळेतून दाखला काढून वाडेबोल्हाईतील जोगेश्वरी माता विद्यालयात अकरावीमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र तो नापास झाला असल्याने पुन्हा याच विद्यालयामध्ये अकरावीमध्ये प्रवेश घेतला होता. काही दिवसांपूर्वी विद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलविण्यात आले होते. सुनील हा तीन विषयांत नापास झाल्याने त्याच्या पालकांना देखील विद्यालयात येण्यास सांगितले होते.
मात्र सुनील याने पालकांना याबाबत कळविले नाही. गुरुवारी (दि. ५) सुनीलला शाळेच्या शिक्षकांनी डोक्यावर वाढलेले केस, विद्यालयातील बेशिस्त वर्तणूक याबद्दल सुनावले होते. त्यानंतर प्राचार्यांनी थेट त्याच्या घरी फोन करून याबाबत माहिती दिली. त्यामुळे सुनीलच्या मनात राग वाढला होता. त्या रागाच्या भरात त्याने आज सकाळी बॅगेत कोयता आणला. प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थी वर्गात जात होते. तो मात्र प्रांगणातच उभा होता. त्याने बॅगमधील कोयता काढून व्यासपीठाच्या बाजूला उभे असलेले शिक्षक धनंजय आबनावे यांच्या पाठीवर वार केले. दोघांमध्ये झटापट सुरू असताना तेथे जवळच असलेले शिक्षक दर्शन चौधरी यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुनीलने त्यांच्या डोक्यावर वार केले.
दरम्यान, सुनीलने आबनावे यांच्यावर सात वार केले होते. त्यानंतर तो दुचाकीवर बसून पसार झाला. या हल्ल्यात दोन्ही शिक्षक गंभीर जखमी झाल्याने त्यांना माजी सरपंच कुशाबा गावडे यांनी गाडीतून वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर तेथून दोघांना आयमॅक्स रूग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.पळून जाण्यासाठी मित्रांची मदत सुनील शिक्षकांवर वार करून पसार झाला. तेव्हा त्या पळून जाण्यासाठी काही मुलांनी मदत केली. त्या मुलांचा तपास घेण्यात येत आहे. भांडखोर असल्याने अनेकदा समज सुनीलने शाळेत गेल्या वर्षी प्रवेश घेतलाहोता. तेव्हापासून त्याने दोन-तीन वेळा भांडणे केली होती. त्याबाबत त्याला समज देण्यात आली होती. त्याची वागणूकही योग्य नव्हती. त्यामुळे शिक्षक त्याला सतत वर्तणूक सुधारण्यास सांगत होते.