बारामती : कोणताही माणूस मोठा होण्यासाठी मागे आई, शाळेतील शिक्षक, सहकारी व मित्रपरिवार यांची महत्वाची भूमिका असते. माझ्या शालेय जीवनात मोकळया तासाला उनाडक्या करणारा मी शाळेतील शिक्षिका मनिषा बर्वे यांच्या सल्ल्यामुळेच लेखक, दिग्दर्शक, कथाकार, पटकथाकार आणि गीतकार म्हणून नावारुपाला येऊ शकलो, अशी भावना दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी व्यक्त केली. अॅग्रीकल्चरल डेव्हल्पमेंट ट्रस्ट बारामती, शारदानगर, शारदा कला मंचआयोजित परिवर्तनव्याख्यान मालेच्या ९६ व्या पुष्पानिमित्ताने अहिरे यांची प्रगट मुलाखत पार पडली. यावेळी आहिरे यांनी आपण लेखक कसे बनलो, बालपण कसे गेले तसेच आयुष्याचा प्रवास उलगडला. माझी आई, शिक्षिका मनिषा बर्वे, यांनी मार्गदर्शन केले नसते तर मी तुमच्या समोर आलोच नसतो. त्यांनी माझ्यातील लेखक ओळखला होता. लहान असलाना मला फेकायची सवय होती. मला फेकूचंद म्हणूून सर्व मित्र चिडवत होते. बर्वे मोकळ्या तासाला मला बोलायला लावत होत्या. मी जे सांगत होतो ते सर्व कथा होत्या. हे त्यांच्या लक्षात आले. आवडलेले लेखन करण्यास सांगितले. तेथून माझ्यातील लेखकाचा जन्म झाला. डॉ. मुंगी यांनी मुलाखतीत विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे अहिरे यांनी दिली. अन्य दिग्दर्शक ज्या पध्दतीने काम करतात; त्यापेक्षा वेगळे काहीतरी करण्याची उर्मी व धमक पहिल्यापासूनच माझ्यात होती. लोकप्रिय व्यक्ती होण्यापेक्षा रसिक प्रिय व्हायला मला नेहमी आवडते. बिकट आर्थिक परिस्थितीत अर्ध्या बिस्किट पुड्यावर दिवस काढावे लागले. परंतु त्यावेळीही मी माइयातत्वाशी कधीही तडजोड केली नाही. कमीत कमी गरजा पूर्ण केल्यानंतर मला जे करावेसे वाटत होते ते करायला सुरुवात केली. कार्यक्रमाला संस्थेचे समन्वयक प्रशांत तनपुरे यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व विविध शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह बारामती परिसरातील नागरिक हजर होते. सूत्रसंचालन विद्यार्थी अनिकेत शिंदे यांने तर पुजा ठोंबरे हिने परिचय करुन दिला. अरुण पुरी यांनी आभार मानले.