पंतप्रधान अाणि मुख्यमंत्र्यांपेक्षा शिक्षक जास्त महत्वाचे : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 06:41 PM2018-09-05T18:41:30+5:302018-09-05T18:42:58+5:30
जिल्हा शिक्षक पुरस्कार साेहळ्यात अजित पवार यांनी सरकारच्या शिक्षक विषयक धाेरणांवर टीका केली.
पुणे : बदलत्या काळानुसार शिक्षकांप्रती आदराची भावना बदलत चालली आहे. तरीदेखील आदर्शवत समाज घडविण्याचे व त्याला दिशा देण्याचे काम शिक्षक करतो. त्याच्या प्रश्नांची दखल शासकीय पातळीवर घेतली गेली पाहिजे. हल्ली शिक्षणविभागासाठी शिक्षणमंत्री नुसतेच जी.आर काढतात. ते काढल्यानंतर मागे घेतात. यासबंधी त्यांना विचारले असता त्यांच्याकडे त्याविषयी स्पष्टीकरण नसते. अशी टीका शिक्षणमंत्र्यांवर करताना समाजात पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांपेक्षा शिक्षक जास्त महत्वाचे आहेत. असे मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा शिक्षक पुरस्कारांचे वितरण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यसरकारच्या शिक्षण विषयक धोरण आणि निर्णय यावर पवार यांनी टीका केली. ते म्हणाले, शिक्षकांचे, प्राध्यपकांचे प्रश्न सोडविणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र त्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. यासगळ्यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शिक्षकांच्या बदल्याच्या प्रक्रियेत पारदर्शीपणा यावा यासाठी आॅनलाईन बदली सुरु केली. हे ठीक आहे. परंतु या बदल्या करीत असताना महिला शिक्षकांचे प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. बदली प्रक्रियेदरम्यान कुणावर देखील अन्याय होवू नये यासाठी राज्यसरकारने काय प्रयत्न केले आहेत? असा प्रश्न पवार यांनी यावेळी उपस्थित केला. यापुढील काळात आॅनलाईन बदल्यांच्या संदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विशेष अधिकार मिळावेत. अशी सुचनाही त्यांनी केली.
शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणा-या पुण्यात जगभरातील विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता येतात. मात्र याच जिल्हयातील शिक्षणाची परिस्थिती पाहिल्यास ती गंभीर आहे. राज्यभरात लाखभर जागा रिक्त असताना प्राध्यापक संंपावर आहेत. 13 तालुक्यात 450 शिक्षकांच्या जागा रिक्त असून 31 शाळांमध्ये एकही शिक्षक नाही. ज्याठिकाणी दोन शिक्षकांची गरज आहे अशा शाळांमधून एक शिक्षक कमी केला जात असल्याने शिक्षण क्षेत्राची अवस्था दयनीय असल्याची खंत ही पवार यांनी व्यक्त केली.