पुणे : कोरोनामुळे राज्य शासनाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात पाठविण्याचा निर्णय घेतला. तसेच नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा वर्गोन्नती देण्याचे जाहीर केले. परंतु, तरीही काही शाळा शुल्क वसुलीसाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असून त्यामुळे शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. मात्र, संस्थाचालकांच्या दबावाखाली शिक्षकांना विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी लागत असल्याचे प्राथमिक शिक्षक संघटनेकडून सांगितले जात आहे.
राज्य शासनाने विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविण्याचा निर्णय घेतला असला, तरी काही शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रश्नपत्रिका पाठवून त्याची उत्तरपत्रिका शाळेत जमा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. शाळांकडून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग व परीक्षा घेतली जात आहे. त्या बदल्यातच शाळा पालकांकडून शुल्काची मागणी करत आहे. केवळ हे दाखवण्यासाठी परीक्षेचा अट्टहास धरला जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र, विविध ठिकाणाहून येणारे पालक आणि शिक्षक यांच्या संपर्काने कोरोना पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना सध्या शाळेत बोलावले जात नाही. मात्र, राज्य शासनाने लॉकडाऊनबाबत कडक निर्बंध घातल्यानंतरही तीन ते चार दिवसांपूर्वीपर्यंत शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीची सक्ती करण्यात आली होती. शिक्षण विभागाने लेखी आदेश काढण्यास उशीर केला. त्यामुळे शिक्षकांना कोरोनाच संसर्ग झाला असल्याचे शिक्षण संघटनेच्या पदाधिका-यांनी सांगितले.
--
काही मुख्याध्यापक संस्थाचालकांच्या दबावाखाली शिक्षकांना शाळेत बोलवतात.त्यामुळे अनेक शिक्षक कोरोना बाधित झाले आहे. त्याची जबाबदारी शाळा व मुख्याध्यापक घेत नाहीत. शासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार निकाल जाहीर केले जाणार आहेत. निकाल तातडीने देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे शिक्षकांना घरी बसून शैक्षणिक काम करण्याची सवलत द्यावी, अशी विनंती शिक्षण विभागाकडे केल्यानंतर शिक्षकांना शाळेत बोलावण्याचे थांबविण्यात आले आहे. मात्र, खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांना संस्थाचालकांकडून शाळेत बोलावले जात आहे.
- नारायण शिंदे, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघटना, पुणे जिल्हा
--
शासनाने आदेश देऊनही काही संस्थाचालक शिक्षकांना शाळेत बोलवत आहेत. पालकांकडून शुल्क वसुली करण्यासाठी अनेक शाळा ऑनलाइन परीक्षा घेत आहेत. परंतु, पालक व शिक्षक यांच्यातील संपर्काने आणि पालकांकडून जमा केल्या जाणाऱ्या उत्तर पत्रिकामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
- विकास थिटे, राज्य सहसचिव, प्राथमिक शिक्षक महासंघ