कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन सुरू असलेली शिक्षणपद्धती अखेर थांबली आणि ऑफलाईन शिक्षण सुरू झालं. पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने शाळा गजबजू लागल्या, या निर्णयाचे सर्वत्र स्वागतही झाले. पण विद्यार्थ्यांची तयारी करून घेताना मात्र शिक्षकांची ओढाताण होत आहे.
२९ एप्रिल रोजी १० वीची परीक्षा आहे. चालू वर्षी होणाऱ्या १० वी व १२ वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचा कस लागणार असून, याचा निकालाच्या टक्केवारीवर काय परिणाम होईल हे मात्र सांगणे सध्या तरी कठीण आहे.
कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर चालू वर्षी ९ वी ते १२ वीच्या शाळा २३ नोव्हेंबर रोजी सुरू झाल्या तर ५ वी ते ८ वीच्या शाळा २७ जानेवारी २०२१ रोजी सुरू झाल्या असून, या शाळांची सध्याची वेळ ही सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत अशी आहे. काही ठिकाणी सकाळी १० ते दुपारी एकपर्यंत अशीही शाळा भरवली जाते. शासनाच्या आदेशानुसार एकूण ३ तास शाळा भरवून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे आहे. विद्यार्थ्यांना शाळेत टिफिन आणायला परवानगी नसल्याने जेवणाच्या वेळेपर्यंत विद्यार्थ्यांना घरी सोडले जात आहे. ज्या शाळा मोठ्या आहेत त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिवसाआड बोलावलं जात आहे.
चालू शैक्षणिक वर्षात ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा केवळ २५ टक्के कमी केला आहे मात्र वेळेचा विचार केला तर विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी असलेल्या वेळेपैकी ५० टक्के अवधी हा संपलेला आहे.शिक्षकांकडे आता उपलब्ध असलेल्या वेळेत त्यांना विद्यार्थ्यांकडून ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यायचा आहे. "मूल्यमापन पद्धती व परीक्षेच्या स्वरुपात कोणताही बदल नाही. १० वी व १२ वी राज्यस्तरीय सार्वत्रिक परीक्षा आहेत. अनेक दिवसांपासून लेखन बंद असल्याने लेखनाचा सराव होणे महत्त्वाचे आहे. काही घटक विद्यार्थ्यांना स्वयंअध्यनन पद्धतीने आत्मसात करावे लागणार आहेत. या आव्हानाच्या काळात परिस्थितीनुरुप बदल करावे लागतील. १० वी व १२ वीची परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावरच असते,तथापि ९ वीपर्यंतच्या मूल्यमापनाबाबत शिक्षण विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुनही कोणतेही मार्गदर्शन घोषित झाले नाही."
- महेंद्र गणपुले,
माजी अध्यक्ष व विद्यमान प्रवक्ता
पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ "कोरोना काळात सहा ते सात महिने अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष केले होते.कमी कालावधीत सर्व विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थी आता जास्त वेळ देतील का हा मोठा प्रश्न आहे.विद्यार्थ्यांनी गुण आणि वेळ यांचा मेळ घातला नाही तर जीवनाचा खेळ होण्याची शक्यता आहे.७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे.अपवाद वगळता विद्यार्थ्यांची जास्त वेळ अभ्यासाला न बसण्याची सवय, शारीरिक आणि मानसिक क्षमता यामुळे खूप अडचणी येणार आहेत."
रतिलाल बाबेल
अध्यक्ष, विज्ञान अध्यापक संघ, जुन्नर
कॅप्शन : नगदवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये १० वीच्या विद्यार्थ्यांना शिकविताना मुख्याध्यापक दीपक घाडगे.