पुणे : सध्या परीक्षा, पेपर तपासणे, निकाल आदी कामांमध्ये शिक्षक व्यस्त असताना १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची माहिती २५ एप्रिलच्या आत आॅनलाइन प्रणालीमध्ये भरण्याचे आदेश राज्यातील शिक्षकांना देण्यात आले आहेत. मागील वर्षी सुरू झालेले सरल डाटा एंट्रीचे काम अजून पूर्ण झाले नसतानाच पुन्हा एका नवीन एंट्रीचे काम शिक्षकांवर थोपविण्यात आले आहे. राज्य शासनाने राज्यातील शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांची सर्व माहिती सरल प्रणालीमध्ये शिक्षकांकडून आॅनलाइन भरून घेतली होती. त्या व्यतिरिक्त आणखी काही स्टुडंट डेटाबेस मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिम (एसडीएमआयएस) प्रणालीमध्ये शिक्षकांनी भरायची आहे. यापूर्वी सरलमध्ये भरलेल्या माहितीचा डाटाबेस एसडीएमआयएसला जोडला आहे. त्याव्यतिरिक्त आणखी माहिती केंद्र शासनाकडून मागविण्यात आली आहे. ती माहिती येत्या २५ एप्रिलच्या आत भरून देण्याचे निर्देश शिक्षकांना देण्यात आले आहे. केंद्र शासनाने येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, शिक्षक शिक्षण आदी योजनांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे एकत्रीकरण करून एकच समग्र योजना राबविली जाणार आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांचे गणवेश, शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती, डिजिटल शिक्षण याविषयक आराखडा तयार केला जाणार आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक राज्याकडून पहिली ते बारावी विद्यार्थ्यांची माहिती मागविली आहे. राज्यातील शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा मोठयाप्रमाणात आहे. त्यातच सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यानंतर पेपर तपासणी करून १ मेच्या आत निकाल लावायचा आहे. त्याचबरोबर जूनच्या पहिल्या आठवडयात ९ वीच्या फेर परीक्षांचे आयोजन करण्याच्या सुचना शिक्षण संचालक कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. विद्या प्राधिकरणाकडून घेण्यात येणाऱ्या चाचण्यांचेही शाळांनीच करायचे आहे. आता पुन्हा दहा दिवसांच्या आत डेटा एंट्री करण्याचे फर्मान शिक्षण विभागाकडून सोडण्यात आल्याने शिक्षक वैतागले आहे. ज्ञानदान करण्याचे काम सोडून डेटा एंट्री आॅपरेटरच बनून रहावे लागत असल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.
डेटा एंट्रीच्या भाराने शिक्षक हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 8:10 PM
राज्य शासनाने राज्यातील शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांची सर्व माहिती सरल प्रणालीमध्ये शिक्षकांकडून आॅनलाइन भरून घेतली होती. त्या व्यतिरिक्त आणखी काहीस्टुडंट डेटाबेस मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिम (एसडीएमआयएस) प्रणालीमध्ये शिक्षकांनी भरायची आहे.
ठळक मुद्देराज्यातील शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा मोठयाप्रमाणात बोजा पुन्हा नवीन एंट्रीचे काम : केवळ १० दिवसांची मुदत