पुणो : गोखलेनगर येथील वीर बाजी प्रभू शाळेतील एका शिक्षिकाने शाळा सुधार समितीच्या निधीतील बिलांच्या रकमेसाठी चक्क स्थानिक नगरसेवकांच्या बनावट सह्या केल्याचा प्रकार आज मुख्यसभेत समोर आला. विशेष म्हणजे, याप्रकरणी संबंधित नगरसेवकाने तक्रार करूनही या शिक्षिकेला केवळ नोटीस बजावून हे प्रकरण दडपले जात असल्याने त्याचे गंभीर प्रतिसाद मुख्यसभेत उमटले. अखेर या प्रकरणा़ची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वास महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिल्यानंतर या वादावर पडदा पडला.
शिक्षण मंडळाकडून शाळेतील दैनंदिन खर्चासाठी शाळांना शाळासुधार समितीच्या माध्यमातून निधी दिला जातो. त्यानुसार, शाळेकडून हा खर्च करण्यात आल्यानंतर, संबंधित नगरसेवकांच्या स्वाक्षरीने या बिलांची रक्कम देण्यात येते.
पंधरा दिवसांपूर्वी या शाळेतील एका शिक्षिकेने नगरसेवक दत्ता बहिरट यांची सही करून काही बिले दिले असल्याचे बहिरट यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर बहिरट यांनी या प्रकाराची तक्रार शिक्षणप्रमुख
बबन दहिफळे यांच्याकडे
केली. त्याबाबत काय झाले, याची विचारणा आज बहिरट यांनी मुख्यसभेत केली.
या वेळी संबंधित शिक्षेकेस नोटीस बजाविण्यात आल्या असून, खुलासा मागविला आहे. मात्र, कोणतीही कारवाई केली नसल्याचे दहिफळे यांनी मुख्यसभेत सांगितले. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवक चांगलेच संतापले, अशा प्रकारे नगरसेवकांच्या खोटय़ा सह्या होत असतील, तर हे प्रकरण गंभीर असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, सभागृहनेते सुभाष जगताप, नगरसेवक किशोर शिंदे, संजय बालगुडे, बाळा शेडगे यांनी केली. (प्रतिनिधी)
या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करणार
दरम्यान, या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन संबंधितांची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मुख्यसभेत दिली. तसेच, जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही कुमार यांनी सांगितले.