- नम्रता फडणीस
पुणे : हल्लीच्या पिढीला सगळंच ‘इन्स्टंट’ हवंय. ना शारीरिक कष्ट करण्याची तयारी, ना बुद्धीला ताण. अगदी विद्यार्थ्यांनाही सर्व काही सहज हवंय. त्यामुळेच इतर देशात बंदी असलेल्या ‘चॅट जीपीटी’चा भारतात मोठ्या प्रमाणावर वापर हाेताना दिसून येत आहे. अगदी पुण्यातील काही शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थीही बिनधास्तपणे प्रोजेक्ट किंवा इतर शैक्षणिक गोष्टींसाठी ‘चॅट जीपीटी’चा वापर करीत असल्याचे समोर येत आहे. याबाबत शिक्षक आणि पालकही अनभिज्ञच आहेत.
तंत्रज्ञानाने दाही दिशा कवेत घेतल्यासारखे वाटत असले तरी त्याचे संभाव्य धोके फारसे कुणाला अवगत झालेले नाहीत. ‘चॅट जीपीटी’ हा त्याच संभाव्य धोक्याचा एक भाग आहे. टेक्नोसॅव्ही व्यक्तीही या तंत्रज्ञानाचा उपयोग जपून करताना दिसत आहेत. अशा स्थितीत विद्यार्थी ’चॅट जीपीटी’चा वापर करीत असतील तर शिक्षक आणि पालकांनो सावधान! ‘चॅट जीपीटी’सारख्या कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केल्यास त्यांच्या वैचारिक क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
फायदे काय अन् धाेके काय?
- तंत्रज्ञान क्षेत्रात कमालीची प्रगती झालेली आहे. गुगलच्याच धर्तीवर आता ‘एआय’ने (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) ‘चॅट जीपीटी’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे सगळी कामे एका झटक्यात आणि कमी वेळेत होत आहेत. काहींना हे वरदान वाटत असले तरी याने अनेकांच्या नोकऱ्याही धोक्यात येऊ शकतात, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.
- या तंत्रज्ञानाविषयी अजूनही म्हणावी तशी माहिती कुणाला नाही. शालेय व महाविद्यालयीन शिक्षणातही या नव्या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना होणारे फायदे सांगितले जात आहेत. उदा : विद्यार्थ्यांना जटिल प्रश्नांची उत्तरे सहज मिळू शकतात. त्यांची कार्यक्षमता वाढीस लागू शकते. परंतु, याचा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेवरदेखील मोठा परिणाम होऊ शकतो.
- एखादा विषय समजून उमजून, स्वत:च्या आकलनानुसार प्रश्नांची उत्तरे तयार करणे या प्रक्रियेलाच या तंत्रज्ञानाने मोठा छेद बसू शकतो. याबद्दल विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे यापुढील काळात शिक्षकांसह पालकांनाही मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल, असे शिक्षणतज्ज्ञ सांगत आहेत.
हे घडत कसं?
मित्र : ए राहुल, काय रे तुझ प्रोजेक्ट आमच्यापेक्षा लगेच कसं झालं? अरे किती अवघड होते. संदर्भ पण मिळत नव्हते.
राहुल : अरे ‘चॅट जीपीटी’ने खूप सोप गेलं.
मित्र : म्हणजे?
राहुल : अरे साेप आहे. माझे बाबा, त्यांच्या मित्रांशी चॅट जीपीटी या ॲपबद्दल बोलत होते. मी ते ऐकलं. याचा वापर कसाही केला जाऊ शकतो, असं ते म्हणत हाेते. म्हणून ‘चला बघू, प्रोजेक्टसाठी करता येतोय का? असं विचार करून मी प्रयत्न केला आणि झालाे सक्सेस.
मित्र : मग झाला?
राहुल : हो, मी मला काय हवं आहे असा विषय टाकला आणि त्याने पूर्ण माहितीच दिल्याने माझे प्रोजेक्ट लगेच तयार झाले.
मित्र : अरे, पण टीचरला कळलं तरं!
राहुल : नाही कळणार, मी जसंच्या तसं न घेता त्यात थोडे बदल करतो ना, मग कसं कळेल.
...म्हणून ‘या’ देशांनी घातली बंदी!
‘एआय’च्या या तंत्रज्ञानावर बऱ्याच देशांनी बंदी घातली आहे. सर्वप्रथम इटलीने बॅन केले. या तंत्रज्ञानामुळे डाटा खूप मोठ्या प्रमाणावर वापरला जाईल आणि त्याचा गैरवापर होईल. म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. त्यानंतर चीन, नॉर्थ कोरिया, सिरीया, क्यूबा, इराण आणि रशियाने बंदी घातली आहे. अनेक शाळांमधील मुले ‘एआय’चा वापर करत असल्याने त्यांच्या मेंदूचा विकास होणार नाही. म्हणून या देशांनी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
चॅट जीपीटी (जेनेरेटिव प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर) म्हणजे काय? :
सध्या तरुणांमध्ये चॅट जीपीटी या तंत्रज्ञानाची चांगलीच चर्चा आहे. चॅट जीपीटी हे एआयने विकसित केलेले नैसर्गिक भाषा प्रक्रिया मॉडेल आहे, जे सर्च बॉक्समध्ये लिहिलेले शब्द समजून घेऊन हवे असल्यास लेख, बातम्या, मुलाखतीसाठी प्रश्न अशा कोणत्याही फॉरमॅटमध्ये उत्तर देऊ शकते. ई-मेल, निबंध कसे असावे यासाठी सुद्धा चॅट-जीपीटीचा वापर केला जाऊ शकतो. चॅट-जीपीटी हे संशोधनाच्या टप्प्यात असल्याने त्याचा वापर सध्या विनामूल्य करता येतो.
तोटे काय?
- चॅट जीपीटी हे फक्त एक लर्निंग मॉडेलसारखे आहे. ते फक्त फीड डेटाच्या आधारेच प्रतिसाद देते. प्रशिक्षित डेटामध्ये फीड असल्यास, ते संबंधित प्रश्नांची उत्तरे देऊ शकते.
- चॅट जीपीटीला मानवी मेंदू इतकी समज नाही. तुम्ही ते वापरत असाल, तर संबंधित कन्टेन्ट तपासून घेणे संयुक्तिक ठरू शकते. शिक्षणात विद्यार्थ्यांना याचा फायदा होत असल्याचे दिसत असले तरी, यामुळे विद्यार्थ्यांची सर्वांगीण विचार करण्याची क्षमता संपुष्टात येऊ शकते.
चॅट-जीपीटी आणि गुगलमध्ये फरक काय?
चॅट-जीपीटी हे वापरकर्त्याशी संभाषण (चॅट स्वरूपात) ठेवण्यासाठी तयार केलेले एक मॉडेल आहे. गुगल हे वापरकर्त्याला त्यांनी मागितलेली माहिती शोधण्यात मदत करण्यासाठी शोध इंजिन इंटरनेटवरील वेब पृष्ठे अनुक्रमित करते, तर चॅट-जीपीटीमध्ये प्रशिक्षण डेटामधून शिकलेल्या माहितीचा वापर होतो. आणखी एक महत्त्वाचा फरक असा आहे की, चॅट-जीपीटी फक्त २०२१ पर्यंतची माहिती देऊ शकते, तर गुगलसारख्या नियमित शोध इंजिनला नवीनतम माहिती मिळत असते.
भारतात ‘चॅट जीपीटी’ वर बंदी नाही. आजही कुणीही त्याचा वापर करू शकतो. महाविद्यालयीन विद्यार्थी वापरत असतीलही, पण ते कळणार कसं? एखाद्या विद्यार्थ्याने ‘चॅट जीपीटी’द्वारे एखादा लेख लिहिला असेल, तर त्याची खातरजमा कशी करणार? यातला तोटा हा आहे की विद्यार्थ्यांना सर्व इन्स्टंट मिळाले तर मुले शिक्षणात कमजोर राहतील. त्यांना ज्ञान अवगत होणार नाही. ‘चॅट जीपीटी’चा वापर विद्यार्थी करीत असतील तरी त्याचा कंटेंट योग्य आहे की नाही, याची खातरजमादेखील व्हायला पाहिजे. आपल्या देशात ‘चॅट जीपीटी’वर बंदी घातली तर चांगलेच होईल.
- यशवंत इंगळे, प्राध्यापक, व्हीआयआयटी इंजिनिअरिंग कॉलेज.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हा एकविसाव्या शतकातला तिसऱ्या दशकापासून सुरू झालेला महाप्रवाह आहे. चॅट जीपीटी हे त्याचे आताचे सर्वांत आधुनिक रूप आहे. यात दिलेल्या प्रश्नांची तयार उत्तरे मिळतात. गुगलमध्ये प्रश्न विचारल्यानंतर निगलिजन्स टू रिझल्ट मिळायचे. चॅट जीपीटी एकच उत्तर देतो. हे तंत्रज्ञान विकसित होऊन सर्वदूर पोहोचल्यावर विद्यार्थ्यांच्या विकासासाठी काय करायचे हा प्रश्न आहे. आपली परीक्षा आता बदलली पाहिजे. ज्या प्रश्नांचे एकच एक उत्तर असलेले प्रश्न यापुढे आपल्या शिक्षण व्यवस्थेतून बाद करावे लागतील. प्रत्येक विद्यार्थ्याने प्रश्नाला दिलेले उत्तर त्याच्या आकलनाप्रमाणे तयार होईल. मुक्त प्रश्नांची (ओपन एंडेड) गरज आहे. माहितीकडून माहितीकडे नेणारे शिक्षण हे चॅट जीपीटीने कालबाह्य केले आहे. आता माहितीकडून ज्ञानाकडे प्रवास करायचा आहे. शारीरिक, बौद्धिक, बोधात्मक कृती केली तर त्याचे ज्ञानात रूपांतर होते. आपण परीक्षेचे स्वरूप बदलले तर मुले चॅट जीपीटीचा साधन म्हणून उपयोग करतील.
- विवेक सावंत, मार्गदर्शक, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ