पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे बारावीची परीक्षा घेतली जात असून संबंधित विषयांच्या परीक्षेनंतर तीन ते चार दिवसांत त्या-त्या विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला सुरुवात होणे आवश्यक आहे. मात्र, पुणे विभागांतर्गत येणाऱ्या तिन्ही जिल्ह्यांतील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांच्या शिक्षकांनी कमीअधिक प्रमाणात उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.विविध प्रलंबित मागण्यांसाठी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीस अनुदानित व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांनी असहकार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शिक्षणमंत्री विनोद तावडे व राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून अनुदानित माहविद्यालयांतील शिक्षकांनी आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या. तसेच, उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला. परंतु, विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित असल्याने पुणे, अहमदनगर व सोलापूर या जिल्ह्यांतील अनेक शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार कायम ठेवला . (प्रतिनिधी)
उत्तरपत्रिका तपासण्यास शिक्षकांचा नकार
By admin | Published: March 24, 2017 4:27 AM