पुणे : आपापसांतील बदलीने इतर जिल्ह्यांतून आलेल्या शिक्षकांनी मिळालेल्या जागेवर रुजू न झाल्यास त्यांना सेवेत दाखल करून घेणार नाही, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतरही अद्याप बहुतांश शिक्षक रुजूच झाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यात समानीकरणातूनही मिळालेले शिक्षक मिळालेल्या शाळांवर गेले नसल्याचे प्रकार समोर येत आहेत.जिल्हा बदलीतून आलेल्या २५ शिक्षकांपैैकी १३ शिक्षक अद्याप रुजू झाले नसल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांनी सांगितले. गेल्या सहा महिन्यांत इतर जिल्ह्यांतून आपल्याकडे आपापसांतील बदलीतून आलेल्या शिक्षकांपैैकी २५ शिक्षक त्यांच्या जागेवर रुजू झाले नव्हते. हे शिक्षक सुरुवातीला अटी व नियम मान्य करून सुरुवातीला सोयीने येतात. नंतर पुन्हा आपल्या सोयीच्या जागेनुसार अंशत: बदलीसाठी फिरत बसतात. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळे अशा शिक्षकांबाबत धोरण म्हणून निर्णय घेतला जाणार असून जे त्यांना मिळालेल्या जागेवर रुजू होणार नाहीत, त्यांना आम्ही सेवेत दाखल करूनच घेणार नाही, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला होता. त्यानंतर मे महिन्याची सुटी संपून शाळा सुरू झाल्या. त्यालाही महिना होऊन गेला तरी हे शिक्षक रुजू झाले नाहीत. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी या शिक्षकांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता आपण अनधिकृतपणे गैरहजर आहात. ही बाब अत्यंत गंभीर असून कार्यालयीन शिस्तीस सोडून आहे. तरी आपणावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, असे पत्र पाठविण्यात आले होते. त्यानंतर २५ पैैकी ११ शिक्षक रुजू झाले असून अद्याप १३ शिक्षक गैरहजर आहेत. (प्रतिनिधी)- अगोदर इतर जिल्ह्यांतून हवा तो जिल्हा मिळण्यासाठी अटी-शर्र्तींंवर हे शिक्षक येतात. नंतर अंशत: बदलीसाठी फिरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचप्रमाण जिल्हाअंतर्गत समानीकरण बदल्या नुकत्याच झाल्या आहेत. यातून ज्या शिक्षकांना गैरसोयीची जागा मिळाली आहे ते शिक्षकही अद्याप तेथे रुजू झाले नाहीत. त्यामुळे काही शाळा अद्यापही बंद आहेत.
नोटिसा देऊनही शिक्षकांची शाळेला गैरहजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2016 5:15 AM