शिक्षकांनी यापुढील काळात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देऊन उपयोग नाही, तर आपल्याभोवताली घडत असलेल्या घडामोडींचे ज्ञानही त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. विविध उपक्रम, अध्यापनाच्या पद्धतींमध्ये बदल करून पुस्तकाबाहेरचे जग उलगडणे गरजेचे आहे. हे करीत असताना त्यांच्यात संस्कारमूल्य रुजविणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आपले ज्ञान सातत्याने अद्ययावत करणे शिक्षकांसह विद्यार्थी आणि समाजाच्या दृष्टीनेही हितावह आहे, असे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेल्या हुजूरपागा शाळेतील शिक्षिका स्मिता करंदीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.हुजूरपागा शाळेत भूगोल हा माझा मुख्य विषय असून, इंग्रजीचेही अध्यापन करते. अध्यापन करताना मी कधीही हातात पुस्तक धरत नाही. अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरचे जग उलगडून दाखविण्याला प्राधान्य देते. राज्यपातळीवर होणाºया शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्येही असेच मार्गदर्शन केले जाते. आताच्या काळात केवळ पुस्तकी ज्ञान देऊन उपयोग नाही, तर विद्यार्थ्यांना शिकताना अधिक रंजकता वाटून त्यातून आनंद मिळायला हवा. आई-वडिलांचा मुलांशी असलेला संवाद कमी होत चालला आहे. मुलांचा अधिक वेळ शाळेतच जातो. त्यामुळे शिक्षकांनी त्यांच्याशी एकरूप होऊन शिकविणे आवश्यक आहे. हे करताना त्यांना नकळतपणे चांगल्या-वाइटाचे भान आणून देणेही गरजेचे आहे, असे करंदीकर यांनी नमूद केले.शिकविताना तंत्रज्ञानाचा वापरही अधिक करणे गरजेचे बनले आहे. त्याचा विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही चांगला फायदा होतो. वेगळ्या पद्धतीने शिकण्याचा आनंद विद्यार्थ्यांना मिळतो. फ्लॅश कार्ड, प्रश्नमंजूषा, प्रतिकृती, सहलीवर आधारित हस्तलिखिते अशा विविध माध्यमांतून हे शिक्षण देता येऊ शकते. आपण ज्ञानरचनावाद स्वीकारला असून, त्यामध्ये कृतीतून शिक्षण हे देणे महत्त्वाचे आहे.आताच्या काळात शिक्षकांची मार्गदर्शकाची भूमिका असायला हवी.विद्यार्थ्यांकडूनही तसा प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे. विषयज्ञानाबरोबरच बाह्य शिक्षणावरही भर देणे आवश्यक आहे. कला, क्रीडा, शारीरिक, कार्यानुभव या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील विविध कौशल्ये हेरून त्यांना प्रोत्साहित करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील विविध कौशल्ये विकसित होत जाऊन त्यांना ज्ञानवर्धनही चांगले होते. जे विद्यार्थी खेळ किंवा इतर उपक्रमांमध्ये सहभागी होतात, ते अभ्यासातही अग्रेसर असल्याचा अनुभव आहे.आजच्या परीक्षा पद्धतीतही काही प्रमाणात बदल होण्याची गरज आहे. तसेच आठवीपर्यंत परीक्षा नाही, हा अनेक शिक्षकांसह विद्यार्थी व पालकांमध्ये गैरसमज आहे. या गोंधळामुळे त्याचा गैरवापरही होतो. पुढच्या वर्गात ढकलल्याने मग अनेक विद्यार्थी नववी-दहावीमध्ये मागे पडतात. पण, अनेक शाळा ही बाब सकारात्मकरीत्या घेऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला उभारी देण्याचे काम करतात. आॅनलाईन तसेच वस्तुनिष्ठ परीक्षांचाही प्राधान्याने विचार व्हायला हवा. पूर्वीची अध्यापन तसेच परीक्षा पद्धती आताच्या तुलनेत चांगली होती. सध्या अनेक विद्यार्थी घोकंपट्टीला प्राधान्य देतात. हे चूक आहे. प्रत्येक विषयाची मूळ संकल्पना स्पष्ट झाल्याखेरीज तो विषय पूर्णपणे उलगडत नाही. त्यासाठी पाठांतरावर जास्त भर न देता त्या संकल्पनेच्या वापरातून प्रश्न सोडविण्याची कला विद्यार्थ्यांमध्ये रुजवायला हवी.मात्र, यात केवळ शिक्षकांचीच चूक आहे, असेही नाही. शिक्षकांना अनेक शालाबाह्य कामे करावी लागतात. त्यात त्यांचा शैक्षणिक कामांचा वेळ जातो. ही कामे कमी किंवा सोपी करणे आवश्यक आहे. त्यांची होणारी ओढाताण कमी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सध्याचे अनेक शिक्षक समर्पित भावनेने काम करीत नाहीत. विद्यार्थ्यांना घडविण्याचा ध्येयवाद त्यांच्याकडे नसतो. कदाचित अतिरिक्त कामांमुळेही हे होत असावे.बदलल्या तंत्रज्ञानाच्या काळात शिक्षकांनीही बदलायला हवे. नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देणे आजची गरज आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन करणे आवश्यक आहे. शिक्षकांनी आपल्या विषयासह इतर अवांतर वाचनही सातत्याने करणे गरजेचे आहे. वाचन हा शिक्षकांच्या जीवनातील अविभाज्य भाग असला पाहिजे. शिक्षकांचे वागणेही आदर्श हवे. शिक्षकही माणूस असल्याने चुका होणारच; पण त्या चुका सुधारून कामात अचूकता वाढायला हवी.
शिक्षकांनी पुस्तकाबाहेरचे जग उलगडावे - स्मिता करंदीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 2:08 AM