- दुर्गेश मोरे
पुणे : पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी गुणवत्ता टिकवण्यावर भर द्यावा. शिक्षकांच्या काही अडचणी असतील तर त्या आम्ही सोडवू. काही धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतील ते करू. पण हे सर्व करत असताना विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारली पाहिजे. सध्याचे शिष्यवृत्तीचे निकाल पुढच्यावेळी बदलले पाहिजे. नाही तर निकालाप्रमाणेच शिक्षकांना पदोन्नती देण्याची वेळ येऊ नये, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षकांचे कान टोचले.
अल्पबचत भवन येथे आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, सुनंदा वाखारे, कमलाकांत म्हेत्रे, रणजित शिवतारे आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत इंग्रजी भाषेतूनही शिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे. मातृभाषा महत्वाची असून जागतिक संवादाची भाषा म्हणून इंग्रजीलाही महत्व देण्याची गरज आहे. प्रत्येक गावात मराठी शाळेबराेबर इंग्रजी शाळा होत असल्याचे दिसत आहे. ३० हजार शिक्षकांची भरती होत असताना त्यामध्ये इंग्रजी माध्यमात शिकलेल्या काही शिक्षकांना घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील इंग्रजी भाषेचा दर्जा चांगला असावा यासाठी काही बदल करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या काही शाळांच्या नावामध्ये इंग्लिश स्कूल असा उल्लेख असून उपयोग नाही तर विद्यार्थ्यांना इंग्रजी चांगली लिहिता वाचता बोलता आली पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी पहिल्यांदा उत्तम इंग्रजी बोलणे लिहिणे शिकले पाहिजे. त्यामध्ये कुठेही कमी पडता कामा नये असेही पवार म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाची पुढील वर्षांपासून १०० टक्के अंमलबजावणी करण्यात येणार आहे. परंपरागत शिक्षण पद्धतीत रोजगार देण्याची क्षमता आणि विद्यार्थ्याच्या संशोधक वृत्तीला कमी वाव होता. नव्या शैक्षणिक धोरणात या बाबींवर भर देण्यात आला आहे. शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना पुढील वर्षांपासून पहिलीच्या आधीची तीन वर्षे महत्वाची मानली जाणार आहेत. या तीन वर्षात मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर आहे.
रमेश चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात ३ हजार ६६८ शाळा असून प्रत्येक गणातून २ शिक्षकांची निवड पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्व तालुक्यातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी व्हावे यासाठी जिल्हाभर मोहीम राबविण्यात येणार आहे.
बारामती शून्य आता कपाळ फोडायचं का-
शिष्यवृत्तीमध्ये काही तालुके मागे पडत आहेत. इयत्ता ८ वी शिष्यवृत्तीत १३ तालुक्यांपैकी पहिल्या क्रमांवर शिरुर तालुका, दुसरा आंबेगा, खेड, मुळशी आणि वेल्ह्याचा समावेश आहे. मात्र असे काही तालुके आहेत काही त्यांचा निकाला शून्य आहे. त्यामध्ये बारामतीचा शून्य निकाल आता कपाळ फोडायचं का आमची लोक काय करतात आम्ही मर मर सहा वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो. आणि इथं... इतर तालुक्यातील विद्यार्थी शिष्यवृत्तीत येत असतील तर बारामती, इंदापूर, भोर, हवेली, पुरंदर, जुन्नरला काय अडचण अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षकांना सुनावले. दरम्यान,इयत्ता ५ वी शिष्यवृत्तीत १३ पैकी कोणत्याही तालुक्याचा निकाल शून्य नाही हे नशिबच म्हणाव लागेल, असेही ते म्हणाले.