इंदापूर : संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना, नागरिक दरवाजाच्या कडीवरदेखील सॅनिटायझर मारून दार उघडत होते. मात्र शिक्षक वर्ग त्यावेळी नागरिकांच्या आरोग्यासाठी कोविड सर्वेक्षण करत होते. त्यानंतर निवडणुका व लसीकरण सर्वेक्षण करून लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांनी मोलाचे कार्य व सहकार्य केले आहे, असे प्रतिपादन शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. कृष्णाजी ताटे यांनी केले.
महाराष्ट्रात राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या वतीने एकूण ४५ गुणवंत शिक्षकांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन मंगळवार (दि.१६) रोजी इंदापूर येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी कोविड योद्धा अधिकारी म्हणून इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रा. विजयकुमार परीट, गट शिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा. ताटे बोलत होते.
यावेळी शिक्षक भारतीचे प्रदेशाध्यक्ष नवनाथ गेंड, प्रदेश उपाध्यक्ष कृष्णाजी ताटे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, गटशिक्षाणाधिकारी राजकुमार बामणे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, राष्ट्रीय कुस्ती पंच शरद झोळ, दत्तात्रय ठोंबरे, दिलीप पाडुळे, श्रीमती बहार खान, सहदेव काळेल, तुकाराम भोसले, सतीश शिंदे, बाळासाहेब चव्हाण, सतीश राऊत, सचिन गुरव, जावेद मुलाणी, संतोष ननवरे, शोभा कदम, संदीप नवले आदी उपस्थित होते.
गटविकास अधिकारी प्रा. विजयकुमार परीट म्हणाले की, मागील वर्षभर आपण कोरोनाच्या भयंकर जागतिक महामारीचा सामना करत आहोत. मागील अतिशय संवेदनशील काळात सर्व अधिकारी व शिक्षकांनी जीवाची पर्वा न करता, कोरोना सर्वेक्षण, चेकपोस्ट, पोलिसांना मदत, धान्य दुकाने, कोविड सेंटर, पंचायत समिती अशा अनेक ठिकाणी शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले इथून पुढेदेखील शिक्षकांना भरपूर कामे पार पाडायची आहेत.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष नवनाथ गेंडा यांनी केले. सूत्रसंचालन रामचंद्र शिंदे यांनी केले तर आभार राजकुमार तरंगे यांनी मानले. कार्यक्रमात उपस्थित अनेक शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे भाषणे केले तर अनेक शिक्षकांनी आपले अनुभव नमूद केले.
१९ इंदापूर
शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षकांचा सन्मान करताना मान्यवर.