वाल्हे : जेऊर (ता. पुरंदर) येथे सोमवारी (दि. २०) मावसभावाला पोहायला शिकवत असताना प्रमोद बाळकृष्ण धुमाळ (वय २२) हा तरुण नीरा डाव्या कालव्यात बुडाला होता. काल सायंकाळी उशिरापर्यंत प्रमोदचा शोध घेण्याचे काम सुरू होते. संध्याकाळ झाल्याने शोध लागला नाही. दरम्यान, आज दुपारी घटनास्थळापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर प्रमोदचा मृतहेद आढळून आला.पुरंदर तालुक्यातील जेऊर येथे नीरा डाव्या कालव्यामध्ये काल मावसभावाला पोहण्यास शिकविताना प्रमोद धुमाळ पाण्यामध्ये बुडाला होता. संबंधित घटनेची माहिती मिळताच पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी तातडीने भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून नीरा लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता दुगल यांना संबंधित कालव्याच्या पाण्याचा प्रवाह कमी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज मंगळवारी (दि. २१) दुपारी २.३० वाजता कालव्यातील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने घटनास्थळापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर प्रमोदचा मृतदेह आढळून आला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याच्या नाकातोंडावर जखमा असल्याचे दिसून आले़सायंकाळी उशिरा शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव यांनी दिली. दरम्यान, प्रमोद हा बाळकृष्ण धुमाळ यांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे शोकाकुल वातावरणामध्ये रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)
पोहायला शिकविताना तरुणाचा मृत्यू
By admin | Published: April 22, 2015 5:32 AM