शिरूर : बालगृहातील मुली प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या मुलींना शाळेत बसवण्याचे आदेश न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापकांना आज दिले. दाखल्याबाबत निर्माण झालेल्या पेचासंदर्भात शाळेने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना विनंती अर्ज करावा, अशीही सूचना त्यांनी केली. ‘महिला सेवाग्रामच्या हलगर्जीपणामुळे आठ मुलींचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती’, या आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या पार्श्वभूमीवर क्रांतिवीर प्रतिष्ठान व यशस्विनी सोशल वेल्फेअर फाउंडेशनने तहसील कार्यालयासमोर घंटानाद करण्याचा इशारा तहसीलदारांना दिला होता. गटशिक्षणाधिकारी संजय मिसाळ यांनी बालगृहाच्या अधीक्षिका एस. बी. भोरकर यांना संपर्क साधला व उद्यापासून संबंधित मुलींना न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पाठवण्याच्या सूचना दिल्या. दुपारी गटशिक्षणाधिकारी मिसाळ, क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे, यशस्विनीच्या प्रमुख दीपाली शेळके, उपाध्यक्षा संगीता मल्लाव, सचिव नम्रता गवारी व आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे यांनी न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक बी. जी. भालेराव यांची भेट घेतली. शाळेने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना आज पत्र पाठवले. मान्यता नसलेल्या आठवीच्या वर्गात संबंधित आठ मुलींना बसवण्यात आले. त्यांना उत्तीर्णही करण्यात आले. मात्र, मान्यता नसल्याने महिला सेवाग्रामने आठवी पास असा शाळा सोडण्याचा दाखला देण्यास असमर्थतता दर्शविली आहे. अशा केसमध्ये शिक्षणाधिकारी त्यांच्या अधिकारात या मुलींचे प्रवेश कायम करू शकतात. (वार्ताहर)
बालगृहातील 'त्या' मुलींना मिळणार हक्काचं शिक्षण
By admin | Published: October 02, 2015 1:04 AM