जगभरात हास्यावर खूप संशोधन सुरू असून सर्वोत्तम औषध म्हणून त्याकडे पाहिले जात आहे, असे नमूद करून मकरंद टिल्लू म्हणाले, की १३ मार्च १९९५ रोजी मुंबईतील डॉक्टर मदन कटारिया यांच्या मनात ‘लाफ्ट फॉर नो रीझन’ हा एक विचार आला. तसेच, ‘केवळ व्यायामासाठी का हसू नये?’ या विचारातून पहिला हास्य क्लब सुरू झाला. आता महाराष्ट्रातील विविध शहरांसह जगभरातील १०६ देशांत हास्य क्लब चालविले जातात.हसणे ही एक भावना आहे. हसण्याचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक काय फायदे होतात? याचा अभ्यास करून त्यातून माणसाची वृत्ती बदलता येईल का? भांडखोर वृत्ती कमी होईल का? आनंदी माणसं निर्माण करता येतील का? नातेसंबंध वाढवता येतील का? हे तपासून मी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. तसेच, सुमारे २० वर्षांपासून नागरिकांना प्रशिक्षण देत आहे, असेही टिल्लू म्हणाले.पुण्यात विठ्ठल काटे यांनी नवचैतन्य हास्य परिवाराच्या १६५ शाखा आणि १५ हजारांपेक्षा जास्त सदस्य आहेत. तसेच, लोकमान्य हास्ययोग संघाचेही काम सुरू आहे. जगभरात १०६हून अधिक देशांत ते सुरू आहे. केवळ २३ वर्षांत एवढ्या देशांत पोहोचणारी ही सर्वांत मोठी चळवळ आहे. हास्याचे अनेक फायदे आहेत; मात्र विनोद असेल तरच हासायचे, असे नाही. तर, विनोदाशिवायसुद्धा हसता येते. हसणे हे केवळ विनोदाचे लक्षण नाही, तर आनंदी मनोवृत्तीची जोपासना करणे आहे.हास्ययोग्य करताना शारीरिक हालचाली, यौगिक श्वसन आणि हास्याचे प्रकार एकत्रितपणे केले जातात. वेलकम हास्य, मिरची हास्य, बलून हास्य, लस्सी हास्य, दोहन हास्य, पतंग हास्य, करंज हास्य असे शंभराहून अधिक हास्ययोगाचे प्रकार आहेत. शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून हे प्रकार तयार केले आहेत. हास्यामुळे श्वसनसंस्थेचा, रक्ताभिसरणसंस्थेचा व्यायाम होतो. हसणे हा चेहऱ्याचा व्यायाम आहे. त्यामुळे चेहरा टवटवीत व आनंदी दिसतो. हसल्यामुळे मेंदूची तरतरी वाढते. तसेच, रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. त्याचप्रमाणे पचनसंस्थेला फायदा होतो, असेही टिल्लू यांनी नमूद केले.सततच्या ताणतणावांवर हास्ययोग हा चांगला उपाय आहे. ८० टक्क्यांहून अधिक आजार ताणतणाव, काळजी आणि नैराश्य यांमुळे होतात. हसल्यामुळे ताण निर्माण करणारे हार्मोन कमी होतात आणि आनंदी हॉर्मोन वाढतात. त्यामुळे मनातील ‘मी आनंदी आहे’ ही भावना वाढते. हसल्यामुळे वेदनाशमन होते. त्यातून पाठदुखी, सांधेदुखी कमी होते.शरीर व मन या दोन गोष्टींकडे पाहिले, तर शरीराच्या फिटनेससाठी आपण शरीराचा व्यायाम करतो. मात्र, आनंदी मनासाठी आपण कोणताच व्यायाम करीत नाही. त्यामुळे हास्ययोग करून आपण अंतर्मनाला आनंदी राहण्याचे प्रशिक्षण देतो. हास्ययोग केवळ ज्येष्ठ नागरिकांचा व्यायाम नाही. तरुणवर्ग कामात अडकला आहे; त्यामुळे विविध नामांकित कंपन्या, पोलीस विभाग, लष्कर, अंध मुले, शाळा-महाविद्यालयांत जाण्यास आम्ही सुरुवात केली आहे. हसण्यामुळे टीम बिल्डिंग वाढत असल्यामुळे विविध कंपन्यांमध्ये हास्ययोगाच्या कार्यशाळा मोठ्या प्रमाणावर घेतल्या जात आहेत. तसेच, नुकतीच अहमदनगर येथील कारागृहामधील कौद्यांसाठी हास्ययोगावर कार्यशाळा घेतली. हास्ययोगाचे महत्त्व वेगवेगळ्या स्तरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मी व माझे सहकारी करीत आहोत, असेही मकरंद टिल्लू यांनी स्पष्ट केले.
हास्ययोगाने वाढतेय तरुणांमध्ये ‘टीम बिल्डिंग’ - मकरंद टिल्लू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 2:13 AM