पुणे : शहरातील मोकाट डुकरांना आवर घालण्याकरिता पालिकेच्या मदतीला ‘टीम ढोणी’ धावून आली आहे. कर्नाटकमधून दहा ते बारा जणांचे मनुष्यबळ मागविले असून दुर्गाप्पा ढोणी यांना हे काम दिले आहे. ढोणी यांच्या पथकाने शहरात विविध ठिकाणी फिरुन मंगळवारी दिवसभरात २७ डुकरं पकडली. शहरात मोकाट डुकरांचा त्रास वाढत चालला आहे. दुर्गंधी व अस्वच्छतेमध्ये त्यामुळे भर पडत चालली आहे. पालिकेच्या मुख्य सभेमध्ये यावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित करीत प्रशासनाला धारेवर धरले होते. या व्यवसायात असलेले बहुतांश जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यामुळे पालिकेने राबविलेली डुक्करमुक्त शहराची मोहीम अनेकदा हाणून पाडली. पालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर निवेदन देत मोकाट डुकरांवर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते. ५८ डुक्कर व्यावसायिकांना नोटिसा दिल्या होत्या. दरम्यान, कर्नाटकचे दुर्गाप्पा ढोणी व तमिळनाडूचे मे. आर. राजकुमार यांच्याकडून पालिकेला पत्रव्यवहार करीत मोफत डुक्कर पकडून देण्याचे आश्वासन दिले होते. पालिकेने यातील दुर्गाप्पा ढोणी यांच्या संस्थेला शहरातील डुकरे पकडण्याचे काम सोपविले आहे. ढोणी हे काम नि:शुल्क करणार असून पकडलेली जनावरे ते घेऊन जाणार आहेत. .......ढोणी यांची दहा ते बारा जणांची टीम आहे. आठवड्यातून दोन वेळा हे काम केले जाणार आहे. डुक्कर पकडताना गरोदर व लहान पिले पकडली जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात येत आहे. त्यांनी यापूर्वी नागपूर व सोलापूर येथे पालिकांसाठी काम केले आहे. नागपूर महापालिकेसाठी काम करीत असतानाच त्यांनी पुणे पालिकेला पत्र पाठविले होते. त्यानुसार, ढोणी यांना काम दिले आहे. पकडलेली डुकरे ते घेऊन जाणार आहेत. बिबवेवाडी, वडगाव शेरी, येरवडा, नागपूर चाळ, हडपसर, कोंढवा, वारजे, कात्रज, सिंहगड रस्ता आदी उपनगरांमध्ये मोकाट डुकरांचा त्रास अधिक आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय वगळता अन्य सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हा त्रास आहे.
मोकाट डुकरांना पकडण्यासाठी पुणे शहरात आली ‘टीम ढोणी’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 1:28 PM
पहिला दिवस : २७ डुकरं पकडली
ठळक मुद्देशहरात मोकाट डुकरांचा त्रासात वाढ