मुंबई : गुगल सर्चच्या आकडेवारीनुसार विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांत गत चॅम्पियन भारतीय संघाला सर्वाधिक ‘सर्च’ करण्यात आले आहे, तर कर्णधारांच्या यादीत डिजिटल जगतात महेंद्रसिंग धोनी सर्वात आघाडीवर आहे.उद्यापासून सुरू होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेविषयी जगभरातील चाहत्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. जागतिक आकडेवारीनुसार टीम इंडिया या वर्षी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक लोकप्रिय संघ आहे. त्यानंतर आॅस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीजचा क्रमांक लागतो.स्टार अव्वल खेळाडूंत विराट कोहली सर्वात पुढे आहे त्यापाठोपाठ कर्णधार धोनी आहे. तिसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी आहे. ज्या परदेशी खेळाडूंना आॅनलाईन अधिक ‘सर्च’ करणयात आले त्यात डेव्हिड वॉर्नर, साकिब अल हसन, मायकल क्लार्क आणि स्टिव्हन स्मिथ यांचा समावेश आहे.कर्णधारांच्या बाबतीत धोनीला सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स, आॅस्ट्रेलियाचा मायकल क्लार्क, इंग्लंडचा इयॉन मॉर्गन आणि पाकिस्तानचा मिस्बाह उल हकचा क्रमांक लागतो. यष्टिरक्षकांच्या यादीतदेखील धोनी अव्वल स्थानी आहे.गोलंदाजांशी संबंधित यादीत आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या गोलंदाजांचा दबदबा आहे, तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताचा स्टुअर्ट बिन्नी सर्वाधिक सर्च करण्यात आला आहे. त्यानंतर बांगलादेशचा साकिब अल हसन, आॅस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ, भारताचा रवींद्र जडेजा आणि आॅस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनचा क्रमांक लागतो. (वृत्तसंस्था)
गुगलवर ‘टीम इंडिया’ची सर्वाधिक चलती
By admin | Published: February 14, 2015 12:18 AM