पिंपरी : काश्मीरमधील उरी येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले लान्स नाईक चंद्रकांत गलांडे यांच्या अस्थींचे श्री क्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीत विधिवत विसर्जन करण्यात आले. शहीद गलांडे यांचे मूळ गाव माण तालुक्यातील जाशी येथून आणलेला अस्थिकलश कात्रजपासून रॅलीने आळंदीपर्यंत नेण्यात आला. वीरपत्नी निशा गलांडे या साडेतीन वर्षांचा मोठा मुलगा श्रेयस, तसेच नऊ महिन्यांच्या छोट्या जयसह रॅलीत सहभागी झाल्या होत्या. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांना पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रीय सैनिक संस्था, मार्शल कॅडेट फोर्स, रॅपिड अॅक्शन फोर्स, इंडिअन एक्स सर्व्हिसेस लीग या संस्थांच्या पुढाकाराने सकाळी साडेसात वाजता कात्रज येथून अस्थिकलश रॅली काढण्यात आली. पिंपरी-चिंचवड येथून आळंदीपर्यंत रॅली नेण्यात आली. २० दुचाकीस्वार रॅलीत सहभागी झाले होते. आळंदी येथे इंद्रायणीत अस्थिविसर्जन करण्यात आले. प्रताप भोसले, महिपाल जांगीड, संदीप भंडारी, डी. एच. कुलकर्णी, डी. एम. कोळी यांनी रॅलीचे आयोजन केले होते.(प्रतिनिधी)वीरपत्नींचा सन्मान भारत-पाक युद्धातील शहीद राम साठे यांच्या वीरपत्नी सुशीला साठे, तसेच नुकतेच उरी येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले लान्स नाईक चंद्रकांत गलांडे यांच्या वीरपत्नी निशा गलांडे यांचा वायू सेनेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पदक प्राप्त झालेले निवृत्त कमांडो सुरेंद्र सिंग त्यागी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
नागरिकांच्याही डोळ्यांत तरळले अश्रू
By admin | Published: October 02, 2016 5:40 AM