लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “अफगाणिस्तानच्या सत्तेचे काय होईल, हा वेगळा प्रश्न आहे. मात्र, तेथील जनतेच्या दु:खाच्या आणि छळाच्या बातम्या ऐकून मी व्यथित झालो आहे. त्यांच्या सांत्वनासाठी माझ्याकडे शब्द नाहीत,” असे उद्गार केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी पुण्यात अफगाण विद्यार्थ्यांशी बोलताना काढले. हे उद्गार काढतानाच त्यांच्याही डोळ्यात अश्रू तरळले. अफगाणी विद्यार्थ्यांना मदत करणे हे आपल्या राष्ट्रहिताचे काम असल्याचे ते म्हणाले.
सरहद संस्थेच्या पुढाकाराने अफगाणिस्तान विद्यार्थी संघटनेचे वली रहमानी, इसाक गयुर, फरसाना अमिनी, मोहम्मद इम्रान, मोहंमद अहमदी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आरिफ मोहम्मद खान यांची भेट घेतली. या वेळी सरहदचे संजय नहार, जाहिद भट, शैलेश पगारिया, नीलेश नवलाखा आदी उपस्थित होते.
सरहद संस्थेने गुरू तेग बहादूर तसेच माता गुजरी यांच्या नावाने एक हजार अफगाणी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी विविध पातळ्यांवर परवानगी मिळविण्यासाठी काय करता येईल, हे मी स्वत:ही पाहीन व योग्य त्या व्यासपीठावर माझे मत मांडून विनंती करेन. मात्र, इथे राहणाऱ्या अफगाणी विद्यार्थ्यांना मदत करणे हे राष्ट्रहिताचे असल्याचे माझे ठाम मत आहे, असे राज्यपाल खान म्हणाले.