मुंबई - मनसेला जय महाराष्ट्र केलेले आणि लोकसभा निवडणूक लढवून इच्छित असलेले पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे पत्रकार परिषदेत भावुक झाल्याचं दिसून आलं. मनसेच्या स्थानिक नेतृत्त्वाकडून होत असलेली कुचंबणा आणि वरिष्ठ नेत्यांनीही दखल न घेतल्याने वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम केला. विशेष म्हणजे राजीनाम्यानंतर त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही फोन आला होता. मात्र, आपण राज ठाकरेंचा फोन घेतला नसल्याचं त्यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेत मनसेचा प्रवास उलगडताना भावूक झालेले मोरे आज पुन्हा एकदा भावूक झाले आहेत. मोरेंनी आपल्या आईसमवेतचा फोटोही ट्विटरवरुन शेअर केला आहे.
वसंत मोरेंनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले की, आजपर्यंतच माझं करियर राज ठाकरेंसोबत होते. मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होतो. पण पक्षातीलच काही नेत्यांचा मला विरोध होता. ते लोक वरिष्ठांपर्यंत चुकीचा निरोप पाठवत होते. राज ठाकरेंकडे भेटीसाठी वेळ मागितली पण त्यांची वेळ मिळाली नाही. मनसेची पुण्यातील कार्यकारिणी चुकीच्या हातात असल्याचा आरोप मोरे यांनी केला. तर, अमित ठाकरे यांच्यासोबतही १ तास याबाबत चर्चा झाली होती. मात्र, कुठलाही निर्णय न झाल्याने आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मोरेंच्या राजीनाम्यानंतर आता ते कुठल्या पक्षात जाणार याची चर्चा होत आहे. तर, राज ठाकरेंसोबत त्यांचं बोलणं झालं की नाही, असाही प्रश्न अनेकांना पडला होता.
राजीनाम्यानंतर भावूक झालेले वसंत मोरे आईसोबतच्या भेटीनेही भावूक झाले आहेत. मोरेंनी ट्विटरवरुन आईसोबतचा फोटो शेअर करत, ''फक्त माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलंय राव...'' असे भावनिक उद्गार वसंत मोरेंनी काढले आहेत.
संजय राऊतांचा फोन, काँग्रेसचीही ऑफर
राजीनाम्यानंतर मला राज ठाकरेंचाही फोन आला होता. पण, मी त्यांचा फोन घेतला नाही, असे वसंत मोरेंनी म्हटले. तर, मला अनेक राजकीय पक्षांचे फोन आले असून शिवसेना उबाठा पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही फोन केला होता, असेही त्यांनी सांगितले. तर, काँग्रेस नेते माजी आमदार मोहन जोशी यांनीही भेट घेऊन पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. दरम्यान, वसंत मोरेंचा अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी ते शरद पवार यांना भेटले होते. त्यामुळे, शरद पवार यांच्या पक्षातही त्यांना संधी असून ते तिकडे जाऊ शकतात, असेही स्थानिक जाणकारांचे मत आहे. कारण, मोरे ज्या भागातून नगरसेवक होते, त्या कात्रजचा काही भाग बारामती मतदारसंघात येतो. त्यामुळे, याचा लाभ थेट सुप्रिया सुळेंना होऊ शकतो.