विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने द्वितीय सत्राच्या परीक्षेचे नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरल्याशिवाय परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करणे विद्यापीठाला शक्य नाही. द्वितीय सत्रास परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना येत्या २५ जूनपर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत १५ जूनपर्यंत होती. परंतु, आता अर्ज भरताना तांत्रिक अडचणींना सामोर जावे लागत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून केल्या जात आहेत.
कोरोनामुळे काही विद्यार्थी सध्या गावाकडे असून नेट कॅफे नसल्याने विद्यार्थ्यांना मोबाइलवरूनच परीक्षा अर्ज भरावे लागत आहेत. शनिवारी दिवसभर विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरताना तांत्रिक अडचणी आल्या. तसेच ऑनलाइन पेमेंटही करता आले नाही. त्यामुळे विद्यापीठाने ही अडचण दूर करावी, अशी मागणी स्टुडंट हेल्पिंग हॅंड संघटनेचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी विद्यापीठाकडे केली आहे.