पुणे : पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरळीत आणि वेगाने सुरु असताना नदीपात्र भागातील एक खांब अर्थात पिलर काढण्याची वेळ आली आहे. कामातल्या तांत्रिक चुकीमुळे खांब काढण्याची वेळ आली तरी मेट्रोच्या कामाच्या दर्जात कोणतीही तडजोड करणार नसल्याचे मेट्रो प्रशासनाच्यामार्फ़त स्पष्ट करण्यात आले आहे. शहरातील वनाज ते रामवाडी मार्गातील मेट्रोचे काम सुरु झाले आहे. नदीपात्र भागातून जाणाऱ्या या मेट्रोचे काम ठिकठिकाणी वेगात सुरु आहे. काही दिवसातच खांब वर आल्याने अनेक उत्साही पुणेकर थांबून मेट्रोची प्रगती बघतात. मात्र गुरुवारी एक खांब तोडण्याचे काम बघून अनेकांनी त्याचे फोटो शेअर केले. नेमके काय चुकले म्हणून खांब तोडला जात आहे की संपूर्ण मार्गावरील खांब चुकलेत अशा अनेक चर्चांना ऊत आला होता. अखेर मेट्रो प्रशासनाने या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
मेट्रोचे मुख्य प्रकल्प अधिकारी गौतम बिराडे यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, खांब उभारून झाल्यावर वरून त्यात टाकलेले काँक्रेट बाहेर येण्यास सुरुवात झाली. हे खांबाच्या सक्षमीकरणासाठी अयोग्य आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यावर तात्काळ तो खांब काढून त्याजागी नवा खांब उभारण्यात येईल. प्रवाशांच्या सुरक्षिततेमध्ये आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. ही चुक अर्थात ठेकेदाराची असल्याने चुकलेल्या खांबाचा खर्चही त्याच्यामार्फत केला जाणारा आहे. यात महामेट्रोला कोणतेही आर्थिक नुकसान झाले नसल्याचे त्यांनी नमूद केले.