प्रसाद कानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे - मुंबई रेल्वेमार्गावर डबल डेकर रेल्वे धावण्याबाबतची संभ्रमावस्था आता दूर होणार आहे. कारण या मार्गावर डबल डेकर चालू शकते का? याची तांत्रिक दृष्टीने पाहणी व अभ्यास करण्याचे निर्देश मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी दिले. ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.
पुणे - मुंबई मार्गावर पूर्वी सिंहगड एक्स्प्रेस ही डबल डेकरच्या रूपात धावत होती. काही वर्षांनंतर ती बंद झाली. त्यानंतर डबल डेकर धावलीच नाही. त्या दरम्यान विद्युतीकरणाचे डीसी (डायरेक्ट करंट)चे रूपांतर एसी (अल्टरनेट करंट)मध्ये झाले. त्याची आता अडचण येते का, हे पाहावे लागणार आहे. सरव्यवस्थापकांनी याची व बोगद्याच्या उंचीची चाचणी करण्यास सांगितले. येत्या काही दिवसांत याची चाचणी केली जाईल. ती जर यशस्वी झाली तर निश्चितच पुणे- मुंबईदरम्यान पुन्हा एकदा डबल डेकर रेल्वे धावेल. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. अनिल कुमार लाहोटी हे गुरुवारी पुणे विभागाच्या दौऱ्यावर आले होते.
बॉक्स १
डब्यांत प्रवासीसंख्या जास्त
सामान्य सेकंड सीटिंग डब्यात ९० व १०८ सीटची प्रवासी क्षमता आहे. डबल डेकरमध्ये अप्पर व लोयर डेक मिळून १२० प्रवासी एका डब्यांत बसू शकतात. डबल डेकर रेल्वे प्रामुख्याने प्रवासी प्रतिसाद जास्त असलेल्या मार्गावर चालविली जाते. पुणे- मुंबई मार्गावर प्रवास प्रवाशांचा प्रतिसाद नेहमीच चांगला असतो. त्यामुळे येणाऱ्या काळात जर पुणे स्थानकावरून जर डबल डेकर धावली, तर पुणेकरांना एका वेगळ्या प्रवासाची अनुभूतीदेखील मिळेल.
बॉक्स २
पुणे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी
पुणे स्थानकावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या लक्षात घेता फलाटाची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुणे स्थानकांवर यार्ड रिमोल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यासदेखील विलंब लागत असल्याने रेल्वेने आता घोरपडीजवळ कॉड लाइन बांधण्याचा निर्णय घेत आहे. यामुळे मिरजहून दौंडला जाणाऱ्या गाड्यांना पुणे स्थानकांवर येण्याची गरज नाही. त्या थेट घोरपडीजवळच्या कॉड लाइनवरून धावतील. त्यामुळे पुणे स्थानकावरील गाड्यांची संख्या कमी होण्यास मदत मिळेल.
कोट : पुणे रेल्वेस्थानक हे ‘ए वन’ दर्जाचे स्थानक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुणे स्थानकावरील प्रवासी सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच डबल डेकर रेल्वे चालविण्यासाठी आवश्यक त्या चाचण्या पूर्ण केल्या जातील.
- अनिल कुमार लाहोटी, सरव्यवस्थापक, मध्य रेल्वे, मुंबई
---
फोटो - पुणे-मुंबई रेल्वे