पुणे : भारतात अजूनही वैैज्ञानिक अंधश्रध्दा आहेत. बदलत्या काळात विज्ञान नाकारुन चालणार नाही. विज्ञान प्रश्नांना उत्तर नव्हे तर प्रश्नांना उत्तर विचारते. वैज्ञानिक शिक्षणातून असा विचार करायला शिकवले जात नाही. वैज्ञानिक शिक्षणातून माणूस स्वयंरोजगारी झाला पाहिजे. आपण केवळ बेरोजगारांचे लोंढे तयार करत आहोत, अशी खंत ज्येष्ठ संशोधक आणि लेखक डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी व्यक्त केली. देशाचे भाग्यविधाते असलेले तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ झारीतील शुक्राचार्य झाले आहेत, असेही परखड मत त्यांनी व्यक्त केले. ‘मसाप गप्पा’ या उपक्रमातंर्गत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांच्याशी अंतर्नाद मासिकाचे संपादक भानू काळे यांनी संवाद साधला. यावेळी वयाची ८० वर्षे पूर्ण केल्याबद्दल दाभोलकर यांचा ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे विशेष सत्कार आला. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम मंगळवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झाला. दाभोलकर म्हणाले, ‘आपण विज्ञान नाकारून चालणार नाही. प्लॅस्टिकबंदीचा निर्णय हा वेडेपणा आहे. या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी सही करताना त्यांच्या हातात प्लास्टिकचे पेन होते. लोखंड, काच, कागद यांच्याप्रमाणेच प्लास्टिकचीही पुनर्प्रक्रिया करता येऊ शकते. मात्र, त्यादृष्टीने विचारच केला जात नाही. विचार करायला प्रवृत्त न करणे हे विज्ञान शिक्षणाचे अपयश आहे.स्वामी विवेकानंद हे माझे आदर्श आहेत, याकडे दाभोलकर यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘वाचन करताना विवेकानंद यांचे पत्र समोर आले. त्यांनी तीन वर्षात देशातील प्रश्न समजून घेण्यासाठी भारत पिंजून काढला. देशातील रोग आणि त्याचे औषध गवसलेले विवेकानंद दार्शनिक होते. आपल्या मनातील प्रतिमा आणि खरे विवेकानंद यात बरेच अंतर आहे, हे विवेकानंद वाचल्यावर समजले. विवेकानंद समजावून देणे ही गरज आहे. आजवर त्यांच्याबद्दलची मांडणी एकांगी आणि विकृतपणे झाली आहे.’------------------दोन्ही पक्ष सारखेच!काँग्रेस आणि भाजप या राजकीय पक्षांमध्ये फारसा फरक नाही. काँग्रेसमध्ये किमान वरवर मुसलमान बांधवांबद्दल सद्भाव दाखवला जातो. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात केवळ हिंदुत्ववाद जोपासून मुस्लिमांबद्दल द्वेष पहायला मिळतो. या परिस्थितीत सामाजिक सलोखा आणि सद्भाव महत्वाचा आहे. तो टिकवायचा असेल तर पुन्हा विवेकानदांच्या विचारांकडे जाणे गरजेचे आहे.----------स्त्रीला अद्यापही व्यक्तिगत विकास साधता येत नाही. त्यामुळे तिला संपूर्ण स्वातंत्र्य दिले असे म्हणता येणार नाही. याला समाजरचना जबाबदार आहे. समाजरचना बदलल्याशिवाय स्त्रीचे व्यक्तिमत्व विकसित होणार नाही. मराठी माणसाच्या मनातील अहंगंड न्यूनगंडातून निर्माण झाला आहे. त्यातून बाहेर पडावे लागेल. समाज परिवर्तन घडवायचे असेल तर केवळ लिहून, बोलून चालणार नाही. त्यासाठी जनआंदोलन हा एकच पर्याय आहे. .............दाभोलकर यांचे व्यक्तिमत्व कोहिनूर हि-यासारखे आहे. आजन्म भारतातच राहून संशोधन क्षेत्रात काम करायचे, हे त्यांनी तरुण वयातच ठरवले. सत्य शोधण्याचा ध्यास आणि ते निर्भीडपणे समाजासमोर मांडण्याचे विलक्षण धैर्य त्यांच्याकडे आहे. विज्ञानावरील निष्ठेमुळे ते क्षणभरही सत्यपासून ढळले नाहीत. हेच करताना त्यांनी साहित्यावरही मनापासून प्रेम केले. वैज्ञानिक लेखनातून प्रतीत होणारा सत्याचा आग्रह धरला.- यास्मिन शेख